आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नोटाबंदी व पश्चिम बंगालमध्ये सैन्य तैनात केल्याप्रकरणी केंद्र सरकारशी संघर्ष करत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जींनी स्वत:वर उपचार करून घेण्यासाठी चांगला डॉक्टर शोधण्याची गरज असल्याचा, सल्ला दिला आहे.
पाटणा येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जींवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये सैन्य दलाला तैनात केल्यामुळे ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार दहशत निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. यावर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, ममता बॅनर्जी घाबरल्या आहेत. त्यामुळेच त्या सचिवालयात बसून राहिल्या. माहीत नाही त्यांना अचानक काय झालं? त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन इलाज करण्याची गरज आहे, असा टोला लगावला.

पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी सैन्याचे पथक तैनात करण्यात आले आहे. केंद्र सरकारने हा नियमित सरावाचा भाग असून याबाबत पश्चिम बंगाल सरकारला सूचना दिली होती असे सांगितले. परंतु ममता बॅनर्जींनी हा दावा फेटाळला होता. सत्ता परिवर्तन करण्यासाठीच केंद्राने सैन्य पश्चिम बंगालमध्ये पाठवले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सुब्रमण्यम स्वामींनी यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही टीका करून घरचा आहेर दिला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासावर कोणत्याही उपाययोजना अथवा पूर्वतयारी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि अर्थ सचिव शक्तिकांता दास यांच्यावरही टीका केली होती. ते दोघेही नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करण्याऐवजी हातावर हात ठेवून बसले आहेत, असे त्यांनी म्हटले होते.