भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चपराक लगावली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काही दिवसापुर्वी काश्मीर पाकिस्तानचा हिस्सा होण्याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला सुषमा स्वराज यांनी आज प्रत्युत्तर दिले.. पाकिस्तानने काश्मीरला दहशतवादाशिवाय काहीच दिलेलं नाही, असे सांगत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान पंतप्रधानांनी बुरहान वानीला शहीद ठरवल्याच्या घोषणेवर टीका केली. भारताचे नंदनवन असणाऱ्या काश्मीरवर पाकिस्तानचे दहशतवादी कधीच विजयी मिळवू शकणार नसल्याचे सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. संपुर्ण भारताच्यावतीने सुषमा स्वराज यांनी काश्मीर कधीच पाकिस्तानचे होणार नसल्याचे यावेळी म्हटले. दहशतवादी बुरहान वानी याच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत पाकिस्तानने केलेली शेरेबाजी त्या देशाचे दहशतवादाशी असलेले लागेबांधे स्पष्ट करणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया भारताने यापुर्वी देखील दिली होती. पाकिस्तानने आपल्या शेजारी देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणे थांबवावे, असा सल्ला  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पाकिस्तानला दिला होता. काश्मीरमधील निदर्शकांच्या मृत्यूबाबत ‘मौन’ पाळल्याबद्दल विरोधकांच्या टीकेला पात्र ठरलेले पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी वानीच्या हत्येमुळे आपल्याला धक्का बसल्याचे निवेदन जारी केल्यानंतर भारताने ही प्रतिक्रिया नोंदवली होती.