हॉटेलवर रॉकेट हल्ला
सुरक्षा अधिकाऱ्यांसह १५ ठार

येमेनचे मंत्रिमंडळ आणि सरकारी अधिकारी उतरलेल्या हॉटेलवर मंगळवारी तीन रॉकेट्स डागण्यात आली. यामध्ये मंत्र्यांना इजा झाली नसली तरी १५ जण ठार झाले आहेत.
अदेन शहरातील हॉटेल अल-कस्रच्या प्रवेशद्वारावर बंडखोरांकडून तीन रॉकेट्स डागण्यात आली. या हॉटेलमध्ये येमेनचे पंतप्रधान खालेद बहाह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य राहतात. यामुळे बंडखोरांनी हा हल्ला केल्याचे सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या हल्ल्यामध्ये संयुक्त अरब अमिरातच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसह १५ जण ठार झाले आहेत. पहिले रॉकेट हॉटेलच्या प्रवेशद्वारावर डागण्यात आले व उर्वरित दोन रॉकेट संयुक्त अरब अमिरातच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या छावणीवर फेकण्यात आली. घटनास्थळी तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले.
स्थानिक वृत्तवाहिन्यांनुसार हल्ल्यावेळी पंतप्रधान खालेद बहाहदेखील हॉटेलमध्ये उपस्थित होते. मात्र त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या घटनेसंबंधी माहिती देण्यास सरकारी अधिकाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.