राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही काँग्रेससाठी एक विचारधारा, तत्व आणि सत्याची लढाई असून ती आम्ही लढणारच, असा विश्वास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज व्यक्त केला. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज संसदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत प्रकट केले.

या वेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते.

ही विचारांची निवडणूक असल्याचा पुनरूच्चार करत एनडीएशी आम्ही ही लढाई लढू असे त्यांनी म्हटले. तत्पूर्वी, राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी राजघाट येथे महात्मा गांधी श्रद्धांजली वाहिली. ही राष्ट्रपतिपदाची निवडणूक दलित विरुद्ध दलित नसून विचारधारेची लढाई असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण २१ व्या शतकात आहोत आणि देशाच्या सर्वोच्च पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीला दलित विरुद्ध दलित असे स्वरुप देऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले होते. मीरा कुमार या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. विभाजनाच्या विचारधारेविरोधात देशाला एकसूत्रात बांधणाऱ्या मूल्यांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या मीरा कुमार आमच्या उमेदवार असल्याचा अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले होते.