गेल्या वर्षी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील सभेतील बॉम्बस्फोटांसह देशात विविध ठिकाणी स्फोटांची मालिका घडवून आणणारा इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या तेहसीन अख्तर ऊर्फ मोनू याला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी नेपाळ सीमेवर अटक केली.
यासिन भटकळच्या अटकेनंतर तेहसीनच मुजाहिदीनची सर्व सूत्रे हलवीत होता. त्याच्या अटकेने आता मुजाहिदीनचे जाळे उद्ध्वस्त झाले आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारीच वकास व त्याच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे.
यासिन भटकळला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक झाल्यानंतर संघटनेची सर्व सूत्रे तेहसीनच्या हाती आली होती. त्यानेच २७ ऑक्टोबर २०१३ रोजी पाटण्यात झालेल्या मोदींच्या सभेत स्फोट घडवून आणले होते. शिवाय वाराणसी, मुंबई आणि पुणे या ठिकाणी अनुक्रमे २०१०, २०११ व २०१२ मध्ये स्फोट घडवून आणण्यातही अख्तरनेच महत्त्वाची भूमिका बजावली होती.