पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गणना जगातील लोकप्रिय राजकारण्यांमध्ये होते. ट्विटर आणि फेसबुकवरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्या कोटींमध्ये आहे. मात्र, ट्विटरकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालात पंतप्रधान मोदींचे अनेक फॉलोअर्स बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटरच्या ऑडिट रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तब्बल ४५ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या माहितीच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. त्यानुसार मोदींच्या एकूण फॉलोअर्सपैकी १,८२,९५, १८५ फॉलोअर्स खरे आहेत, तर १,४४,९१, ८८४ फॉलोअर्स बोगस आहेत.

याशिवाय, अन्य भाजप नेत्यांचा विचार करायचा झाल्यास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या ट्विटर अकाऊंटवर सर्वाधिक बोगस फॉलोअर्स आहेत. राजनाथ सिंह यांचे तब्बल ६४ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. त्यानंतर बोगस फॉलोअर्सच्याबाबतीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा क्रमांक लागतो. त्यांचे ७३ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. तर भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरील ७१ टक्के फॉलोअर्स बोगस असल्याचे समोर आले आहे.

तर काँग्रेस नेत्यांच्याबाबतीतही ही परिस्थिती फारशी वेगळी नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ४९ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. तर काँग्रेस पक्षाचे ट्विटर अकाऊंट फॉलो करणाऱ्यांपैकी ६९ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. याशिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे केवळ २२ टक्के फॉलोअर्स खरे असल्याची माहिती समोर आली आहे.