उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारला १०० दिवसांचा कालावधी पूर्ण होत असतानाच बरेली येथे ४० वर्षीय महिलेचे रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेचे तिच्या दोन मुलांसह अपहरण करण्यात आले होते. या महिलेवर अपहरण करणाऱ्या नराधमांनी सामूहिक बलात्कार केला असून तब्बल ४ दिवस पीडित महिलेवर नराधमांनी अत्याचार केला. पीडित महिलेने स्वतःची सुटका करुन पळ काढला असून तिची मुलगी मात्र अजूनही अपहरणकर्त्यांकडेच आहे.

११ दिवसांपूर्वी ४० वर्षीय पीडित महिला तिचा १३ वर्षाचा मुलगा आणि ११ वर्षाच्या मुलीसह पानिपतला जाण्यासाठी निघाली होती. बरेली रेल्वे स्थानकावर येताच गुंडांनी तिचे अपहरण करुन गिन्नौर येथे नेले. पीडित महिलेला गुंगीचे औषध देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चार दिवसांनी पीडित महिलेवर अत्याचार सुरु होते. तिच्या मुलासह तिथून पळ काढण्यात यश आले. पण तिची मुलगी मात्र अपहरणकर्त्यांच्या तावडीतच आहे. पीडित महिलेने याप्रकरणात चांदौसी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार दाखल केली. पोलिसांनी चार नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींमध्ये दोन महिलांचादेखील समावेश असल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर येताना भाजपने कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा यावर भर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतरही उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरु आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी योगी सरकारला १०० दिवस पूर्ण होत असतानाच सामूहिक बलात्काराची घटना समोर आल्याने योगी सरकारची नाचक्की झाली आहे.