पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुवाहटी येथे आयोजित रॅलीत सरकारने मिळवलेल्या यशाचा पाढा वाचला. देशातील प्रत्येक ठिकाण हे माझ्यासाठी दिल्लीसारखं आहे. जनतेच्या सहयोगातूनच हे सरकार काम करत आहे. देशात निराशेची जागा आता आशेने घेतली आहे. चांगलं होणारंच असा विश्वास आता लोकांमध्ये पाहायला मिळतो, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
२०२२ सालापर्यंत देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं मोदींनी सांगितलं. स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच केंद्र सरकार चालवण्यासाठी जनतेचं इतक्या मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळताना दिसत आहे. मी लहान व्यक्ती असून देशातील लहान व्यक्तींसाठी मला मोठी कामं करायची आहेत, असे मोदींनी सांगितले.

स्वच्छ भारतच्या योजनेला देशातील जनतेनेच आंदोलनाचे स्वरूप दिले. यात माध्यमांनीही सहकार्य केले. विरोधी पक्षाकडून सुरूवातीला यास विरोध होताना दिसला, पण कालांतराने त्यांनीही या योजनेचे महत्त्व ओळखून विरोध करणं बंद केलं. जनतेच्या सहकार्याने सरकार कसं चालवावं याचं हे उत्तम उदाहरण असल्याचही मोदी म्हणाले.

मोदींनी यावेळी अप्रत्यक्षपणे याआधीच्या यूपीए सरकारवर टीका केली. काही वर्षांपूर्वी संसदेत ९ सिलिंडर हवेत की १२ यावर तासंतास चर्चा व्हायची आणि आज मी देशातील जनतेला सिलिंडरवर मिळणारे अनुदान सोडण्याचे आवाहन केले. परिणामी, एक कोटी जनतेने आतापर्यंत आपले अनुदान सोडण्याची तयारी दाखवली. हे या सरकारचे यश असल्याचं मोदींनी सांगितलं.

नोटाबंदीचा निर्णय सर्वात कठीण निर्णय होता. अशा निर्णयाची कधी कोणी कल्पनाही केली नव्हती, असे अनेकजण सांगतात. या निर्णयानंतर जनतेला भडकावण्याचेही प्रयत्न केले गेले. नोटाबंदीच्या निर्णयामागे सरकारचा कोणताही वाईट हेतू असता तर आज सरकार टीकलंच नसतं. पण देशाच्या सव्वाशे कोटी नागरिकांनी निर्णयाला पाठिंबा दिला. हा जनतेचा विजय आहे, असं मोदी म्हणाले.