पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्यात रेडिओवरुन ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधतात. मात्र या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी अल्पसंख्यांकांवरील वाढत्या हल्ल्यांवर एकदाही भाष्य न केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. काल (२५ जून) पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून देशातील जनतेला संबोधित केले. मोदींच्या या ‘मन की बात’नंतर जलालुद्दीन खान यांनी ‘मन की बात’ करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

जलालुद्दीन खान यांच्या १५ वर्षीय मुलाची २२ जून रोजी ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेवरुन जलालुद्दीन खान यांनी पंतप्रधान मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. ‘देशात मुस्लिमांबद्दल एवढा तिरस्कार का?, माझा मुलगा भारतीय नव्हता का?, त्याचा दोष काय होता?, जमावाकडून मुस्लिमांच्या होणाऱ्या हत्यांबद्दल पंतप्रधान मोदी मौन केव्हा सोडणार?,’ असे अनेक प्रश्न जलालुद्दीन खान यांनी उपस्थित केले आहेत. ‘द टेलिग्राफ’ दैनिकाशी बोलताना जलालुद्दीन यांनी हे संतप्त सवाल केले आहेत.

‘वाढत्या तिरस्काराच्या भावनेमुळे मी माझा मुलगा गमावला. ही माझी ‘मन की बात’ आहे आणि ही ‘मन की बात’ मोदी साहेबांपर्यंत पोहोचावी, अशी माझी इच्छा आहे. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळूनही, सारे कुटुंब शोकाकुल असूनही रविवारी (२५ जून) काही ग्रामस्थांसोबत पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ ऐकली,’ असे जलालुद्दीन खान यांनी सांगितले. ‘पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये माझा मुलगा जुनैदच्या हत्येबद्दल एक शब्ददेखील नव्हता. आम्हाला मोदींकडून वेगळ्या अपेक्षा होत्या,’ असे जलालुद्दीन यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी १५ वर्षीय जुनैदच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त करतील किंवा किमान निषेध तरी करतील, अशी आशा जलालुद्दीन खान यांना होती. ‘पंतप्रधान मोदी या घटनेबद्दल काही बोलले असते, तर माझा, माझ्या कुटुंबीयांचा आणि माझी समुदायाचा तुटलेला विश्वास मजबूत झाला असता. आम्ही खूपच असुरक्षित आहोत आण आम्हाला खूपच असहाय्य वाटत आहे,’ असेदेखील जलालुद्दीन खान यांनी म्हटले. माझ्या इतर मुलांची अवस्था जुनैदसारखी होणार नाही, याची काळजी पंतप्रधान मोदींनी घ्यावी, अशी विनंतीदेखील त्यांनी केली.

१५ वर्षांच्या जुनैदची हरयाणातील बल्लभगडवरुन परतत असताना रेल्वे स्थानकावर हत्या करण्यात आली होती. रेल्वे प्रवासादरम्यान जुनैद आणि त्याचा भावांचे चार-पाच तरुणांशी सीटवरुन भांडण झाले. यानंतर या तरुणांनी ‘गोमांस खाणारे’ म्हणत जुनैद आणि त्याच्या भावंडांच्या डोक्यावरील टोपी उडवून लावली आणि दाढी खेचण्याचा प्रयत्न केला. भांडणानंतर जुनैद रेल्वे स्थानकावर उतरला. यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. एकाने जुनैदला चाकूने भोसकले. यानंतर जखमी जुनैदचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू झाला.