चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे प्रतिपादन

ब्रिक्स देशांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकमेकांच्या प्रश्नांचा विचार करीत विश्वास तसेच धोरणात्मक संपर्क वाढवावा असे आवाहन चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले. ब्रिक्स देशांमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

ब्रिक्स शिखर बैठक तीन दिवस चालणार असून त्याचा प्रारंभ ब्रिक्स व्यापार मंडळाच्या कार्यक्रमाने फुजियान प्रांतातील शियामेन शहरात झाला. तेथे मवार वादळाने थैमान घातल्याने जोरदार पावसाने शिखर बैठकीच्या तयारीवर वाईट परिणाम झाला. शहरातील वाहतूकही विस्कळित  झाली होती.

दहशतवादाचा फटका सर्वच देशांना बसत असून त्यावर सर्वसमावेशक दृष्टिकोनातून प्रतिकार केला पाहिजे, असे जिनपिंग यांनी दहशतवादाच्या मुद्दय़ावर असे सांगितले. ब्रिक्स देशात सहकार्याची आवश्यकता आहे. शेवटी उंच इमारतीचा पाया भक्कम असावा लागतो त्यामुळे या देशांच्या संघटनेचा पाया भक्कम करण्यासाठी एकमेकात सहकार्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही एकमेकांच्या विकास प्रारूपांचा आदर करतो, असे सांगून एकमेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी परस्पर विश्वास व धोरणात्मक संपर्क वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

भारताशी चीन-पाकिस्तान मार्गिकेबाबत असलेल्या मतभेदांचा उल्लेख टाळून त्यांनी केवळ ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्पाचा संदर्भ दिला. ही मार्गिका पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने त्याचा भारताने निषेध केला होता. हा प्रकल्प म्हणजे भूराजकीय कार्यक्रम राबवण्याचे साधन नसून केवळ व्यवहार्य सहकार्याचा मार्ग आहे, ती परदेशी मदतीची योजना नाही तर आंतरसहकार्यातून विकासाचा उद्देश त्यात आहे. त्यातील फायदे अनेक देशांना होणार आहेत, असे क्षी जिनपिंग यांनी स्पष्ट केले. एकूण १००० प्रतिनिधी या शिखर परिषदेस उपस्थित आहेत. चीनने या वेळी इजिप्त, केनिया, ताजिकिस्तान, मेक्सिको, थायलंड या देशांना अतिथी  देश जाहीर केले असून त्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले होते.