राष्ट्रीय महामार्गावरील हरित मार्ग योजनेस केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत प्रारंभ झाला. या योजनेतंर्गत देशभरात राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यात येतील.
वृक्षारोपण, संवर्धन, सौंदर्यीकरण व संरक्षण या चार सूत्रांवर आधारीत या योजनेसाठी केंद्र सरकारने दरवर्षी एक हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याची घोषणा गडकरी यांनी केली. केवळ सरकार नव्हे तर स्वयंसेवी संस्था, शेतकरी, खासगी कंपन्या, पर्यावरण प्रेमींना या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
गडकरी म्हणाले की, महामार्गाच्या विकासासाठी असलेल्या एकूण निधीपैकी एक टक्के रक्कम या योजनेसाठी राखीव ठेवण्यात येईल. राष्ट्रीय महामार्गावरील या हरित क्रांतीमुळे ग्रामीण भागात पाच लाख लोकांना रोजगार मिळेल. केवळ वृक्षारोपणावर आमचा भर नाही. तर इस्त्रोने विकसित केलेल्या भूवन व गगन सॅटेलाईटमार्फत झाडांवर लक्ष ठेवण्यात येईल. प्रत्येक झाडाची निगा राखण्यात येईल. शिवाय प्रत्येक झाडाचे ऑडीट होईल. लोकांना रोजगार देणे व पर्यावरणपूरक विकास करणे – असे प्रमुख उद्देश या योजनेचे आहेत. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारांनीदेखील याच प्रकारची योजना सुरू करावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.