बॉलीवूड अभिनेता अजय देवगण उपस्थित राहणार असलेल्या बिहारमधील प्रचारसभेला मंगळवारी हिंसक वळण लागल्याची घटना घडली. अजय देवगण भाजपचे उमेदवार सुनिल कुमार यांच्या प्रचारासाठी नालंदातील बिहार शरीफ येथे आला असताना हा प्रकार घडला. अजय देवगण याठिकाणी सकाळी १०.३० वाजता येणार होता. मात्र, त्याला येण्यास तब्बल तीन तास उशीर झाला. अजय देवगणचे हेलिकॉप्टर बघितल्यानंतर येथील गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे लोकांनी पोलिसांवर दगडफेक आणि खुर्च्या फेकण्यास सुरूवात केली. त्यानंतर जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तब्बल अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होता आणि यामध्ये पोलिसांसह तब्बल १२ लोख जखमी झाल्याची माहिती आहे.  दरम्यानच्या काळात कार्यक्रम होत असलेल्या मैदानात मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती पोलीस अधीक्षक विवेकानंद नायडू यांनी दिली. दरम्यान, या सगळ्या गोंधळामुळे अजयचे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरविण्यातच आले नाही.