प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण; प्रस्तावावर काँग्रेस विचार करत नसल्याने नाराज

काँग्रेसचे नेते आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आणि आमच्या प्रस्तावावर ते विचारही करीत नसल्यामुळे राज्यात आघाडी होणे शक्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी यांनी व्यक्त केले.

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात मुंबईसह इतर शहरात आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन तसा प्रस्तावही देण्यात आला आहे. यापूर्वी नगर परिषदेच्या निवडणुकीतही अनेक ठिकाणी आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्या ठिकाणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता होऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका बघता आघाडी होईल, असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार मोठय़ा प्रमाणात निवडून आले होते. नगर परिषदेत पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे पक्षाचा जनाधार वाढत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आघाडी करण्याची भूमिका आहे. मात्र, काँग्रेसकडून सकरात्मक निर्णय घेतला जात नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढेल आणि त्यासाठी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते तयार असल्याचे पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई भाजप आणि शिवसेनेविरोधात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसबरोबर आघाडीचे प्रयत्न – तटकरे

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू असून जिल्हा व तालुका पातळीवरही शक्य असेल तेथे अशी आघाडी करण्याची सूचना देण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे स्पष्ट केले. चिपळूण तालुक्यातील पक्षांतर्गत राजकारणात नेहमी पक्षाचे जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांच्या विरोधात राहिलेले माजी आमदार रमेश कदम यांची पाठराखण करणाऱ्या तटकरे यांनी आज मात्र जाधव पक्षसंघटनाचे काम उत्तम प्रकारे करत असल्याचा निर्वाळा देत जिल्हा परिषद निवडणुकांची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली असल्याचे जाहीर केले. चिपळूण नगर परिषद निवडणुकीत गैरसमजातून काही प्रकार घडल्याचे नमूद करत त्यांनी जाधवांची पाठराखणही केली.तसेच कदमांनी वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय जाहीर केला असल्यामुळे पक्षाच्या दृष्टीने तो विषय संपला असल्याचे जाहीर केले.