शेतकरी हा अर्थकारणाचा कणा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विकास सोसायटीच्या  माध्यमातून सुलभ अल्पदरात कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र सहकार क्षेत्र अडचणीत असल्यामुळे याबाबत योग्य नियोजन करून विकास सोसायट्या सक्षमपणे उभ्या करणे आवश्यक आहे. यादृष्टीने शिखर बँकेने विशेष प्रयत्न करायला हवेत. कृषि उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री केंद्र यांच्या मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शिखर बँकेने प्रयत्न करावेत. यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मत महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केले.

येथे आयोजित केलेल्या  दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई  शेड्युल्ड बँक शाखेच्या उद्घाटन सोहळा समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या शिखर बँकेच्या व्हीनस कॉर्नर येथील नूतन शाखेचे सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते . या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, नाबार्डचे माजी अध्यक्ष वाय.पी. थोरात, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, प्रशासकीय मंडळाचे सदस्य के.एन. तांबे, ए.ए. मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करावयाचा असेल तर ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला केंद्रिबदू ठेवून विकास सोसायट्या सक्षम करणे आवश्यक आहे.  शासनाने शेतमाल तारण योजना सुरु केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यांसारख्या योजनांना चालना मिळणे आवश्यक असून या पाश्र्वभूमीवर  शिखर बँकेची शाखा कोल्हापूर सारख्या कृषिप्रधान जिल्ह्यात सुरु होत आहे हे अभिनंदनीय आहे. सभासद हे सहकारी संस्थांचे खऱ्या अर्थाने मालक आहेत. त्यामुळे सभासदांनी जागृत राहणे आवश्यक असल्याचे मत या वेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

नाबार्डचे माजी अध्यक्ष वाय. पी. थोरात यांनी  मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी शिखर बँकेच्या इतिहास व स्थित्यांतराच्या टप्प्यांचे पॉवर पॉइर्ंटच्या माध्यमातून सादरीकरण केले.  येथील नूतन शाखेत शंभर कोटीची ठेवी ठेवणाऱ्या कोल्हापूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते ठेव पावतीचे प्रदान करण्यात आले. तसेच या शाखेतील पहिले गृहकर्जदार यासीन यांना २५ लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.