कोल्हापुरात सभापतिपदी सेना सदस्य

‘हाती ’ केवळ  स्वतचे एकच मत असतानाही शिवसेनेचे नियाज खान हे काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मदतीने कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन समिती सभापतिपदी सोमवारी निवडले गेले. स्थायी समिती सभापती निवडीसाठी शिवसेनेने काँग्रेसला मदत करून आपली औकात भाजपला दाखवली होती. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करत औकात दाखवून दिली. खान यांनी भाजप-ताराराणी आघाडीचे  शेखर कुसाळे यांचा ८ विरुद्ध ५ मतांनी पराभव केला.  नियाज खान यांच्या रूपाने शिवसेनेला महापालिकेत पहिल्यांदा मानाचे  सभापतिपद मिळाल्याने शिवसनिकांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला .

सोमवारी  होणाऱ्या या निवडणुकीत काय होणार याची चर्चा आठवडाभरापासून रंगली होती .  महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने परिवहन समिती सभापतिपदासाठी शिवसेनेच्या नियाज खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडून शेखर कुसाळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. ऐनवेळी वादविवाद , धोका नको म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीतून चंद्रकांत सूर्यवंशी यांचाही डमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकराला  निवडणूक प्रक्रिया सुरू झाली . यशाची खात्री असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य तिरंगी रंगाचे तर खान हे भगवा फेटा बांधून सभागृहात आले होते.

उमेदवारी अर्ज  माघारीच्या मुदतीत सूर्यवंशी यांनी अर्ज मागे घेतला . त्यामुळे खान व कुसाळे यांच्यात थेट लढत झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांचे परिवहन समितीचे ८ सदस्य नियाज खान यांच्याबाजूने राहिले . तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे ५ सदस्य कुसाळे यांच्या बाजूने मतदान करते झाले . खान यांचा विजय झाल्याची घोषणा  डॉ. राजेश देशमुख यांनी केली . खान यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेला बळकटी आणण्यासाठी तसेच उत्पन्नात भर घालणाऱ्या योजना राबवण्याची ग्वाही दिली.