विविध विकासकामांचा प्रारंभ

रेल्वे सेवा-प्रकल्प सुसाट सुटण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे उद्या शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध सेवांची सुरुवात, कोनशिला अनावरण आणि लोकार्पण सोहळा यांचा समावेश आहे.

यामध्ये पुणे-दौंड-बारामती विभागाच्या डीईएमयू सेवेची सुरुवात व्हिडिओ िलकच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुणे-मिरज-लोंढा ४६० कि.मी. रेल्वे लाइनचे दुपदरीकरणाचे कोनशिला अनावरण आणि पुणे-दौंड विद्युतीकरण, वेस्टवॉटर रिसायकिलग प्लांट, पुणे स्टेशनावरील सोलर सिस्टीम प्रकल्प, पुणे स्टेशनवरील नि:शुल्क वायफाय सुविधा यांचे लोकार्पणही केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडिओ िलकच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. विश्रामबाग ते माधवनगरमधील १३० क्रमांकाच्या फाटकावरील पुलाची सुरुवातही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

१४ डब्यांच्या डीईएमयू या सेवेची निर्मिती करण्यात आली असून ती पुणे-दौंड-बारामती या मार्गावर सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा सर्व आधुनिक उपकरणांनी सुसज्जीत असून या गाडीची आसनक्षमता १०८१ आहे. ही गाडी परंपरागत गाडय़ांच्या पेक्षा गती आणि सुविधा जास्त चांगली राहणार आहे.

पुणे-मिरज-लोंढा लाइन ही महाराष्ट्राच्या पुणे आणि कर्नाटकाच्या लोंढा स्थानकांना जोडते. ही रेल्वे लाइन ४६८ कि.मी.ची आहे. पुणे-मिरज लाइन २८० कि.मी. तर मिरज-लोंढा १८५ कि.मी. आहे. तिचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण खर्च ४७८६ कोटी रुपये होणार आहे. या दुपदरीकरण कामाचे कोनशिला अनावरणही व्हिडिओ िलकद्वारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे.

सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग आणि माधवनगर या राज्य महामार्गावरील पदमाळे रोडवर पूल निर्माण करण्यात येणार असून त्यासाठीचा सुमारे २१ कोटी रुपये खर्च होणार आहे. अनेक वर्षांपासून जनतेची या पुलाबाबतची मागणी पूर्ण होणार आहे. या कामाचेही कोनशिला अनावरण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे.