बघता-बघता वर्ष सरलं. क्रीडाविश्वात वर्षभरात घडलेल्या अनेक गोष्टी चाहत्यांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या. मागे वळून पाहताना मात्र त्या गोष्टींची दखल घेणे मात्र आवश्यक आहे. अशाच काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा हा ‘मागोवा’..
‘द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ अशी तुलना होत असलेल्या फुटबॉलचा महासोहळा या वर्षी चाहत्यांना अनुभवता आला. जगातील अव्वल ३२ संघ फिफा विश्वचषकासाठी एकमेकांशी झुंजले. उरुग्वेच्या लुइस सुआरेझने इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर घेतलेला चावा, रॉबिन व्हॅन पर्सीने हवेत झेप घेऊन हेडरवर केलेला अप्रतिम गोल, व्हॅनिशिंग स्प्रेचा वापर, गतविजेत्या स्पेनचे साखळी फेरीतच संपुष्टात आलेले आव्हान, नेयमारला झालेली दुखापत, त्यामुळे मायदेशात जर्मनीकडून ७-१ने पराभव पत्करण्याची ब्राझीलवर आलेली नामुष्की, जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोसचा विश्वचषकातील सर्वाधिक गोलांचा विक्रम, लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाचे विश्वचषक उंचावण्याचे हुकलेले स्वप्न आणि १० वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर जर्मनीची विश्वचषकाला गवसणी, जेम्स रॉड्रिगेझ, मारिओ गत्झ यांसारखे जगाला मिळालेले सितारे अशा अनेक कारणांमुळे २०१४ची विश्वचषक स्पर्धा गाजली. त्याचबरोबर २०१८, २०२२च्या फिफा विश्वचषकाच्या आयोजनाचे हक्क देताना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे अनेक देशांनी बहिष्कार घालण्याचा दिलेला इशारा, भारतीय फुटबॉलला नवी झळाळी देणाऱ्या इंडियन सुपर लीगला पदार्पणातच मिळालेले यश यामुळे २०१४ हे वर्ष फुटबॉलच्या इतिहासात संस्मरणीय ठरणार आहे.
२४ वर्षांनंतर जर्मनीला जगज्जेतेपद
स्पेन, इंग्लंड, इटली आणि पोर्तुगाल या युरोपातील दिग्गज संघांना साखळी फेरीतच पराभव पत्करावा लागल्यानंतर ब्राझील, अर्जेटिना, जर्मनी आणि नेदरलँड्स हे अव्वल संघ जेतेपदाच्या शर्यतीत होते. दुसऱ्या फेरीत मजल मारण्यासाठी ‘करो या मरो’ असलेल्या सामन्यात सुआरेझने चिएलिनीच्या खांद्यावर चावा घेतला आणि ‘चावरा सुआरेझ’ ही त्याची जगभरात प्रतिमा निर्माण झाली. या कृत्यामुळे सुआरेझवर फिफाने चार सामन्यांची बंदी घातली. जेम्स रॉड्रिगेझच्या सुरेख कामगिरीमुळे कोलंबिया आणि बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरी गाठत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. उपांत्य फेरीत ब्राझील, जर्मनी, नेदरलँड्स आणि अर्जेटिना या दिग्गज संघांनी अपेक्षेप्रमाणे मजल मारली. मात्र त्याआधी कोलंबियाच्या जुआन झुनिगाने चुकीच्या पद्धतीने नेयमारला जमिनीवर आदळत जायबंदी केले. मायदेशात विश्वचषक उंचावण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ब्राझीलसाठी हा मोठा धक्का होता. नेयमारला पाठीच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकावे लागले. मात्र जर्मनीने उपांत्य फेरीत ब्राझीलची धूळधाण केली. ब्राझील संघाला पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवामुळे देशवासीय शोकसागरात बुडाले. अर्जेटिनाने नेदरलँड्सवर पेनल्टी-शूटआऊटमध्ये मात करून अंतिम फेरी गाठली. जर्मनीचे ११ विरुद्ध लिओनेल मेस्सी असा अंतिम सामना रंगला. जर्मनीच्या बचावपटूंनी मेस्सीला रोखून धरले. मात्र अतिरिक्त वेळेत रंगलेल्या या सामन्यात ११३व्या मिनिटाला मारिओ गत्झने केलेल्या गोलमुळे जर्मनीने तब्बल २४ वर्षांनंतर विश्वचषकावर नाव कोरले.
ईपीएल, ला लीगामध्ये चुरस
इंग्लिश प्रीमिअर लीग आणि ला लीगा फुटबॉल स्पर्धेचा पहिला टप्पा जवळपास संपत आला आहे. ईपीएलमध्ये खरी चुरस असते ती चेल्सी, मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, अर्सेनल आणि लिव्हरपूल या दिग्गज संघांमध्ये. पण अर्सेनल आणि लिव्हरपूल हे सुमार कामगिरीमुळे पहिल्या पाच संघांमध्येही स्थान मिळवू शकले नाहीत. चेल्सी आणि मँचेस्टर सिटीने चांगली कामगिरी करत समान गुणांसह अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे. मँचेस्टर युनायटेड तिसऱ्या क्रमांकावर असून दुसऱ्या टप्प्यात कोणता संघ कामगिरीत सातत्य राखतो, यावर जेतेपदाचा फैसला रंगणार आहे. विश्वचषकानंतर रिअल माद्रिद आणि बार्सिलोना यांनी दिग्गज खेळाडूंना करारबद्ध करत आपला संघ तगडा केला. त्यामुळे ला लीगामध्ये रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाचा बोलबाला राहिला आहे. गेल्या वर्षीचा विजेता अ‍ॅटलेटिको माद्रिद तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. मेस्सीने सर्वोत्तम कामगिरी करत ला लीगा आणि चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोलांचा विक्रम आपल्या नावावर केला.
आयएसएलची मेजवानी
प्रो-कबड्डी लीगनंतर इंडियन सुपर लीगचा प्रयोग भारतात यशस्वी झाला. भारतीय फुटबॉलला नवी झळाळी देण्यासाठी आयएमजी रिलायन्स आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयएसएलच्या रूपाने महत्त्वाकांक्षी योजना राबवली. निकोलस अनेल्का, अलेझांड्रो डेल पिएरो, मॅन्यूएल फ्राइडरिच, रॉबर्ट पिरेस, जुआन कॅपडेव्हिया, मिकेल सिल्व्हेस्टर आणि लुइस गार्सिया यांसारख्या दिग्गज फुटबॉलपटूंचा खेळ पाहण्याची संधी देशभरातील चाहत्यांना मिळाली. मुंबई सिटी एफसी, पुणे सिटी एफसी, केरळ ब्लास्टर्स, अ‍ॅटलेटिको डी कोलकाता, दिल्ली डायनामोस, चेन्नईन एफसी, गोवा एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी या आठ संघांमध्ये रंगलेल्या प्रत्येक सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्टेडियमवर उपस्थित राहून चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणात दूरचित्रवाणीवरूनही या सामन्यांचा आस्वाद घेतला. भारतातील युवा खेळाडूंनाही गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली. केरळ आणि कोलकाता यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करून पहिल्यावहिल्या आयएसएल जेतेपदाला गवसणी घातली. देशातील पायाभूत सोयीसुविधा उभारण्याच्या दृष्टीने आयएसएलच्या निमित्ताने क्रांतिकारी पाऊल टाकण्यात आले आहे.