विश्वचषक.. मग तो एकदिवसीय असो किंवा ट्वेन्टी-२०, पाकिस्तानला भारताविरुद्ध अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. २००७च्या पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकामधील ‘टाय’ लढतीनंतरचा बॉलआऊटचा थरार असो की अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवून प्राप्त केलेले जगज्जेतेपद. भारताचे विश्वचषकामधील वर्चस्व हे पाकिस्तानला अद्याप झुगारता आलेले नाही. परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील लढत ही क्रिकेटरसिकांसाठी नेहमीच पर्वणी ठरत आली आहे. शुक्रवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत याच उत्कंठेनिशी दोन्ही संघ आपल्या अभियानाला प्रारंभ करणार आहेत. २०१४ या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत जरी भारताला अपेक्षित यश मिळाले नसले तरी ट्वेन्टी-२०च्या निमित्ताने नवी सुरुवात भारतासाठी आशादायी ठरू शकेल.
बुधवारी सराव सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढय़ संघाला हरवले. परंतु तरीही इतिहास बदलण्यासाठी पाकिस्तानचा संघ उत्सुक आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आतापर्यंत झालेल्या तिन्ही लढती या भारताने जिंकल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकामधील पाच लढतीही भारताने जिंकल्या आहेत. परंतु पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा अधिक ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे, ही एकमेव गोष्ट त्यांच्यासाठी अनुकूल असेल. भारतीय संघ गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.
भारत-पाकिस्तान लढतीच्या निमित्ताने खेळाडूंच्या कौशल्याचाही कस लागणार आहे. ‘दे घुमाके’ फटकेबाजीसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या शाहिद आफ्रिदीला आर. अश्विनच्या फिरकीचे आव्हान असेल, तर विराट कोहलीच्या धाडसी फलंदाजीचा उमर गुलच्या वेगवान माऱ्याशी मुकाबला असेल; तसेच सईद अजमलच्या जादूई गोलंदाजीला महेंद्रसिंग धोनी कशी टक्कर देतो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
भारतासाठी या वर्षांची सुरुवात फारशी समाधानकारक झाली नाही. आशिया चषक स्पध्रेत बांगलादेश व अफगाणिस्तान या दोन संघांविरुद्ध भारताने विजय मिळवले. भारताने पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यासारख्या सर्व महत्त्वाच्या संघांकडून हार पत्करली. याचप्रमाणे पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करला. परंतु बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात २० धावांनी विजय मिळवला. परंतु प्रत्यक्ष स्पध्रेतील थरार निराळा असेल. धोनी सेना मोहम्मद हाफीझच्या संघाचा कसा सामना करील, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत आफ्रिदीने अखेरच्या षटकात भारताच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला होता. त्या कटू आठवणी अद्यापही ताज्या आहेत. त्यामुळे विजयाचे दडपण हे दोन्ही संघांवर आहे. शेर-ए-बांगला स्टेडियमवरील या सामन्याच्या तिकिटासाठी क्रिकेट चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.
गुरुवारच्या सामन्याच्या दृष्टीने अनेक प्रश्न धोनीपुढे आहेत. एक म्हणजे अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश करावा. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये भारतासाठी चिंताजनक स्थिती आहे. रोहित शर्मा आणि  शिखर धवन यांची कामगिरी ट्वेन्टी-२०मध्ये चांगली होत नाही. राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर म्हणून सातत्याने धावा काढणााऱ्या अजिंक्य रहाणेलाही आत्मविश्वास मिळालेला नाही. याचप्रमाणे धोनी आणि संघनिवडीवर टीकाकार वारंवार शरसंधान साधत आहेत. मागील ट्वेन्टी-२० विश्वचषकात धोनीने इरफान पठाणला सलामीवीर म्हणून वापरले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पठाणने ३१ धावा काढल्या, परंतु त्यासाठी तितकेच चेंडू घेतले होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ हरला व परिणामी स्पध्रेतील आव्हानही संपुष्टात आले.
चांगली सुरुवात ही भारतासाठी महत्त्वाची ठरते. विराट कोहली फॉर्मात आहे, ही भारतासाठी आणखी एक अनुकूल गोष्ट ठरेल. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ४७ चेंडूंत नाबाद ७३ धावा केल्या. धोनीचा विश्वासू खेळाडू सुरेश रैनाही फॉर्मात आहे. रैनाने श्रीलंकेविरुद्ध ३१ धावा केल्या, तर इंग्लंडविरुद्ध ३१ चेंडूंत ५४ धावा केल्या. युवराज ट्वेन्टी-२०मधील धडाका टिकून आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने चांगल्या धावा केल्या होत्या. भारताच्या मागील पाच ट्वेन्टी-२० सामन्यांपैकी चार सामन्यांत त्याने सामनावीर किताब जिंकला आहे. धोनी स्वत:सुद्धा दुखापतींवर मात करून परतला आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने १४ चेंडूंत २१ धावा केल्या. कर्णधाराचा फॉर्म हासुद्धा या स्पध्रेत महत्त्वाचा ठरणार आहे.

फलंदाजीपेक्षा भारताला सध्या गोलंदाजीची समस्या भेडसावत आहे. फलंदाजीतही चांगली कामगिरी करून १० ते १५ धावा अधिक जमवण्याकडे आमचा कल असेल. त्यामुळे गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. युवराज सिंग व सुरेश रैना यांचे गोलंदाजीतही योगदान मिळू शकते.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

भारताला विश्वचषक ट्वेन्टी-२० सामन्यात एकदाही पराभूत करू शकलो नसलो तरी शुक्रवारच्या सामन्यात शाहीद आफ्रिदीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आम्हाला आहे. तळाच्या क्रमांकावर येऊन आफ्रिदीने आशिया चषकातील सामन्याप्रमाणे सामन्याचा शेवट करावी, हीच आमची इच्छा आहे.
मोहम्मद हाफीझ, पाकिस्तानचा कर्णधार

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वरुण आरोन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, सुरेश रैना, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, रोहित शर्मा, युवराज सिंग.
पाकिस्तान : मोहम्मद हाफीझ (कर्णधार), अहमद शेहझाद, बिलावल भट्टी, जुनैद खान, कमरान अकमल, सईद अजमल, शाहिद आफ्रिदी, शरजील खान, शोएब मलिक, सोहेब मकसूद, सोहेल तन्वीर, मोहम्मद तल्हा, उमर अकमल, उमर गुल, झुल्फिकर बाबर.
सामन्याची वेळ : सायं. ७ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.