ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे फलंदाजांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटचा परिणाम एकदिवसीय क्रिकेटमध्येही पाहायला मिळत आहे. मला वाटतं की, जर २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना या घडीला खेळण्याची मुभा दिली, तर खेळाडू या सामन्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील, असे मत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

‘दक्षिण आफ्रिकेत २००३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी आम्ही मोठय़ा उत्साहाने उतरलो होतो.  पण त्या वेळी ऑस्ट्रेलियाने केलेली धावसंख्या फारच मोठी वाटत होती. हा सामना आम्ही गमावला. पण जर सध्याच्या परिस्थितीमध्ये हा सामना पुन्हा खेळण्याची आम्हाला परवानगी दिली तर आमच्या दृष्टिकोनामध्ये मोठा बदल झालेला असेल,’ असे सचिन म्हणाला.

ऑस्ट्रेलियाने २००३ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना ३५९ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २३४ धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने  विश्वचषकाला गवसणी घातली होती.

‘भारताने तीनशे धावांचा टप्पा गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याचदा ओलांडला, पण त्या वेळी क्रिकेटचा आराखडा बदलला होता. वातावरणासह नियमांमध्येही काही बदल करण्यात झाले होते. पण ट्वेन्टी-२० क्रिकेटचाही या बदलांमध्ये महत्त्वाचा भाग आहे,’ असे सचिन म्हणाला.

आचरेकर सर चित्रपट पाहणार

रमाकांत आचरेकर सर नसते तर मी घडू शकलो नसतो. त्यामुळे बुधवारी त्यांनाही हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे, असे सचिनने सांगितले.