भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी व सुरक्षा समितीच्या प्रमुखपदी माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. समितीचे प्रमुख रवी सवानी यांची मुदत लवकरच संपत असून त्यांना मुदतवाढ होण्याची शक्यता नाही.
नीरज कुमार हे २०१३ मध्ये दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाले आहेत. मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया व सचिव अनुराग ठाकूर हे त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक पुढील आठवडय़ात होणार असून या बैठकीत नीरज कुमार यांच्या नियुक्तीबाबतचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. नीरज कुमार हे दिल्लीचे पोलीस आयुक्त असताना कसोटीपटू एस. श्रीशांत, स्थानिक खेळाडू अंकित चव्हाण व अजित चंडीला यांचे मॅच-फिक्सिंगचे प्रकरण उघडकीस आले होते.
लाचलुचपतविरोधी समितीवर पोलीस खात्यातील वरिष्ठ पदाचा अनुभव असलेल्या निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असे दालमिया यांनी नुकतेच सांगितले होते. त्यानुसार नीरज कुमार यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.