तुम्ही वेळेआधी विमानतळावर पोहचलात तर काय करता? फोनवर टाइमपास करता, तिथल्या दुकानांमध्ये फिरता, पुस्तक वाचता, गाणी ऐकता किंवा चहा कॉफी पिऊन आपला वेळ घालवता. पण कायमच काहीतरी हटके करण्यासाठी ऑन आणि ऑफ फिल्ड लोकप्रिय असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने याबाबतीही आपले वेगळेपण दाखवून दिले.

जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक असणारा धोनी चेन्नई विमानतळावर विमानाची वाट बघत जमिनीवर झोपला होता आणि त्याने तिथेच एक पॉवर नॅपही घेतली. ‘बीसीसीआय’च्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेल्या ट्विटमधून धोनीचे हटके अंदाज समोर आला आहे.

आयपीएलमुळे धोनीचे होम ग्राऊंड झालेल्या चेन्नईच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना टीम इंडियाने दिमाखात जिंकला होता. यानंतर २१ तारखेच्या पुढील सामन्यासाठी टीम कोलकत्त्याला जाण्यासाठी चेन्नई विमातळावर वेळेआधीच पोहचली. मात्र, तिथे वेळ कसा घालवावा असा प्रश्न टीम इंडियातील खेळाडूंना पडला नाही. यावेळी धोनी वेटिंग रुमच्या फरशीवरच बॅग उशाला घेऊन आडवा झाला. बाकी खेळाडूंनीही त्याच्या आजूबाजूला आपले सामान टाकून आराम करण्याचा निर्णय घेतला. हे फोटो ‘बीसीसीआय’ने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केले आहेत. पांढऱ्या जर्सीमधील सर्व खेळाडू या फोटोमध्ये जमिनीवर बसलेले दिसत आहेत. पांढरी जर्सी, स्पोर्टस शूज, गॉगल्स लावलेल्या धोनीच्या आजूबाजूला विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि के. एल राहूल गप्पा मारताना दिसत आहेत. या संदर्भातला फोटो खुद्द के. एल. राहुलने ट्विट केला असून त्या खाली, ‘हल्ली टीमबरोबर प्रवास करणे म्हणजे हे असं असतं’ असे वाक्य लिहीले आहे.