निराशा झटकून आशादायी भरारी; टीकाकारांना चपराक
मॅरेथॉनमध्ये कविता राऊतला सुवर्णपदक
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊतने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉन शर्यतीत सुवर्णपदकाचा आनंद द्विगुणित केला. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी कविता केवळ चौथी भारतीय धावपटू आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या नेमबाज चैन सिंगने स्पर्धेतील दुसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरले. १४६ सुवर्ण, ८० रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह भारत पदकतालिकेत २४९ पदकांसह अव्वल स्थानी आहे.
धावपटू कविता राऊतने मॅरेथॉन स्पर्धेत अव्वल स्थानासह रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत धावण्याचे स्वप्न जोपासणाऱ्या कविताने २ तास, ३८ मिनिटे आणि ३८ सेकंदांत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदकावर नाव कोरले. ओ.पी. जैशा, ललिता बाबर, सुधा सिंग यांच्यासह आता कविताही रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
यंदाच्या दक्षिण आशियाई स्पर्धेतील कामगिरीद्वारे ऑलिम्पिकवारी पक्की करणारी कविता पहिली भारतीय क्रीडापटू ठरली आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या नितेंदर सिंग रावतने पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक नावावर केले. त्याने २ तास, १५ मिनिटे आणि १८ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. भारताच्या खेता रामने २ तास, २१ मिनिटे आणि १४ सेकंदांत शर्यत पूर्ण करत कांस्यपदक मिळवले. भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटूंनी २८ सुवर्ण, २२ रौप्य, ९ कांस्यपदकांसह एकूण ५९ पदकांवर नाव कोरले.

‘‘गुवाहाटीमधील हवामान आणि नाशिकमधील हवामानात बरेचसे साम्य आहे. आपल्याशा वाटणाऱ्या या हवामानाने शरीराला आणि जिद्दीला योग्य साथ दिली आणि जे काही घडले ते सर्वासमोर आहे,’’ अशी प्रतिक्रिया ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत-तुंगारने व्यक्त केली आहे. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक मिळवत तिने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची किमया साधली आहे. मागील काही दिवसांमध्ये कविताकडून विशेष कामगिरी होत नव्हती, तसेच विजेतेपदापासूनही ती दूरच असायची. पहिल्या तिघांमध्ये येण्यासाठीही झगडावे लागल्याने ‘कविताची कारकीर्द संपली’ असे म्हटले जाऊ लागले. मात्र तशी हाकाटी पिटणाऱ्यांना रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत कविताने सणसणीत चपराक दिली आहे. सातत्याने अपयश येत गेल्याने निराशा आली असली तरी अपयशामुळे खचून जाणारी किंवा संपून जाणाऱ्यांपैकी कविता नाही, हे पुन्हा एकदा तिने दाखवून दिले आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनसाठी पात्र ठरण्याकरिता कवितापुढे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा हा अंतिम पर्याय शिल्लक होता. अलीकडे झालेल्या काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील खालावलेली कामगिरी पाहता कविताकडून या स्पर्धेत फारशी अपेक्षाही कोणी बाळगली नव्हती. परंतु याआधी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदकांची कमाई करण्याचा चमत्कार करून दाखविणाऱ्या कविताने पुन्हा एकदा चमत्कार करून दाखविला. रिओ ऑलिम्पिकच्या मॅरेथॉनसाठी दोन तास ४५ मिनिटे ही पात्रता असल्याने या वेळेच्या आत तिने ४२ किलोमीटर अंतर पूर्ण करणे आवश्यक होते. कविताने दोन तास ३८ मिनिटे ३८ सेकंद या वेळेत हे अंतर कापत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.
मागील महिन्यात जानेवारीत झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये कविताची भारतीय स्पर्धकांमध्ये पाचव्या क्रमांकावर घसरण झाली होती. त्या मॅरेथॉनमध्ये २:४९:४३ अशी तिची वेळ होती, तर भारतीयांमध्ये अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या सुधा सिंगने २:३९:२८ अशी वेळ दिली होती. या निराशाजनक पाश्र्वभूमीवर कविता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल, याची आशा सर्वानीच सोडली होती. या ऑलिम्पिकसाठी पात्र न ठरल्यास भविष्यात पुन्हा अशी संधी येणे शक्य नाही, हे लक्षात घेत कविताने सदैव तिला मानसिक धैर्य आणि आत्मविश्वास दिलेल्या नाशिक येथील भोसला शैक्षणिक संकुलातील मैदानावर प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव सुरू केला. त्यासाठी तिने काही दिवस तिथेच मुक्काम ठोकला. या सरावाचा अनुकूल परिणाम गुवाहाटीमध्ये दिसून आला. दक्षिण आशियाई मॅरेथॉनमध्ये कविताने नोंदविलेली २:३८:३८ ही वेळ मुंबई मॅरेथॉनमध्ये भारतीयांत अव्वल आलेल्या सुधा सिंगने दिलेल्या वेळेपेक्षा कमी ठरली. वेळेच्या या अंतरावरूनच कवितामध्ये झालेला बदल लक्षात येईल.
मुंबई मॅरेथॉनप्रसंगी हवामानाने साथ न दिल्याने कामगिरी निराशाजनक झाल्याचे कविता नमूद करते. काही कौटुंबिक समस्यांमुळेही मन एकाग्र करणे अशक्य झाले होते. त्याचा परिणाम मैदानातील कामगिरीवर होत गेला. या समस्या दूर झाल्याने गुवाहाटीमध्ये सर्व काही जुळून आले, असेही तिने सांगितले.

प्रशिक्षकांना वाढदिवसाची भेट
दऱ्याखोऱ्यातील खाचखळग्यांच्या रस्त्यावरून कविताला नाशिकमध्ये आणत तिला यशाचा मार्ग दाखविणारे प्रशिक्षक
विजेंद्र सिंग यांचा १२ फेब्रुवारी हा वाढदिवस. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत कविताने आपल्याला वाढदिवसाची भेट दिली असल्याचे मत सिंग यांनी मांडले. या कामगिरीमुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली नाशिकची पहिली खेळाडू हा लौकिक कविताने मिळवला आहे.

हॉकीत रौप्यपदकावर समाधान
राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीत भारतीय पुरुष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारतावर १-० अशी मात केली. या विजयासह पाकिस्तानच्या पुरुष हॉकी संघाने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक नोंदवली. अवैसूर रेहमानने पाकिस्तानतर्फे एकमेव गोल केला. भारतीय संघाला समर्थन देण्यासाठी चाहत्यांनी मौलाना तयेबुल्ला स्टेडियमवर मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. पण भारतीय संघाला गोल करण्यात आणि गोलसाठी संधी निर्माण करण्यात अपयश आले.

कबड्डी : भारताची आगेकूच
पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी आपापल्या लढती जिंकत दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. पुरुष संघाने नेपाळवर ४७-२३ असा विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत श्रीलंकेवर ३५-२१ अशी मात केली. दोन्ही सामन्यांत राहुल चौधरीच्या अष्टपैलू खेळाने छाप पाडली. काशिलिंग आडके आणि अनुप कुमार यांच्या चढायांची त्याला छान साथ लाभली. महिलांमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेला ३७-१३ असे नमवले. यात तेजस्विनी बाई, पायल चौधरी आणि प्रियांका यांनी अप्रतिम खेळ केला.

नेमबाजी : चैन सिंगला दुसरे सुवर्ण
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र नेमबाज चैन सिंगने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी प्रकारातील चारही सुवर्णपदकांवर भारतीय नेमबाजांनीच नाव कोरले. ऑलिम्पिक पदकविजेता गगन नारंगला मागे टाकत चैनने अव्वल स्थान पटकावले. १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात चैन, गगन व इम्रान खान या त्रिकुटाने १८६३.४ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या २० मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात नीरज कुमारने सुवर्ण, गुरप्रीत सिंगने रौप्य तर महेंदर सिंगने कांस्यपदक मिळवले.

बॉक्सिंग : दमदार सलामीसाठी सज्ज
ऑलिम्पिक पदकप्राप्त मेरी कोमसह भारताचे अव्वल बॉक्सिंगपटू दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार सलामीसाठी सज्ज झाले आहेत. दहा भारतीय बॉक्सिंगपटू दहा विविध वजनी गटात सहभागी होणार असून, १० सुवर्णपदकांसाठी मुकाबला होणार आहे. शिवा थापा, सविता कुमारी, एल. देवेंद्रो सिंग, मनोज कुमार, मनदीप जांगरा, विकास कृष्णन असे अव्वल बॉक्सिंगपटू सहभागी होणार आहेत. ५१ किलो महिलांच्या गटात सर्वाच्या नजरा पाच वेळा विश्वविजेत्या आणि लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमच्या कामगिरीकडे असतील.

 

– अविनाश पाटील