वरिष्ठ गटामध्ये महाराष्ट्राचे जलतरणपटू ओघानेच चमकताना दिसतात, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच वेळी ज्युनियर आणि सब-ज्युनियर पातळीवर महाराष्ट्राचे असंख्य खेळाडू शानदार कामगिरी करताना दिसतात. पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. शालेय स्तरावर चमकणारी ही मुले पुढे व्यावसायिक किंवा वरिष्ठ स्तरावर मात्र क्वचितच आढळतात. अभ्यासाच्या वाढत्या दबावामुळे विद्यार्थिदशेतच अनेक जलतरणपटू खुडून जातात, हे महाराष्ट्रातील वास्तवदर्शी चित्र आहे.
दहावीच्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी नववीपासूनच विद्यार्थ्यांची तयारी सुरू होते. अकरावीचा टप्पा विद्यार्थी ओलांडतो तोच बारावीची ‘अग्निपरीक्षा’ समोर असते. यानंतर पदवी शिक्षण किंवा अभियांत्रिकी, वैद्यकीय, यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आणि प्रवेश मिळाल्यानंतर गुण मिळविण्याची स्पर्धा सुरू होते. चांगले गुण, चांगली नोकरी आणि त्याबरोबरीने आर्थिक स्थैर्य या सगळ्यांचा विचार या धावपळीमागे असतो. सहावी-सातवी-आठवीमध्ये जलतरणाला नियमित वेळ देणारी मुले मग अभ्यासचक्रात अडकतात आणि जलतरणात राष्ट्रीय जेतेपद मिळवूनही आर्थिकदृष्टय़ा समृद्ध होण्याची हमी नसल्याने हे जलतरणपटू मागे पडतात.
‘‘अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवूनही सरकारी नोकरी मिळावी, यासाठी मला प्रचंड खटपट करावी लागली. मदत योग्य वेळी मिळाली तर त्याचा उपयोग होतो अन्यथा संधी हातातून निघून जातात. नोकरी मिळाली तर संपूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रित करता येते, त्यामुळे चांगल्या कामगिरीसाठी मानसिक तयारी होते. नोकरीचे पाठबळ असेल तर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारता येते. मात्र जलतरणाच्या माध्यमातून नोकऱ्या फक्त रेल्वे, केंद्रीय राखीव पोलीस दल अशा हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत कंपन्या देत असल्याने अभ्यासाची नाळ तोडून जलतरणाला प्राधान्य द्यायला कोणी तयार होत नाही, हे वास्तव स्पष्ट झाले आहे,’’ अशा भावना आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडेने व्यक्त केल्या.
ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक सुबोध डंके यांनी सांगितले की, ‘‘वयोगटानुसार स्पर्धा सुरू झाल्यापासून अनेक लहान मुले-मुली या खेळाकडे वळू लागली. साधारण नववीपर्यंत मुलांचा आणि पालकांचा उत्साह अमाप असतो. मात्र दहावी-बारावीचा टप्पा जवळ येतो तसं हळूहळू जलतरणाकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते. हे टाळण्यासाठी पालकांची मनोवृत्ती सकारात्मक होणे आवश्यक आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘शिक्षण आवश्यक आहेच; पण त्याला दिले जाणारे अवास्तव महत्त्व टाळण्याचा प्रयत्न पालकांनी केला पाहिजे. त्याचबरोबर जलतरणपटूंसाठी नोकऱ्यांची उपलब्धता व्यापक झाल्यास पालकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, या खेळातही कारकीर्द घडवता येऊ शकते, हा विश्वास निर्माण होईल.’’