इंग्लंडचा आघाडीचा क्रिकेटपटू जो रुट याने भारताचा कर्णधार विराट कोहली याला रोखण्यासाठी संघाच्या गोलंदाजी योजनेत बदल करण्याची गरज असल्याचे विधान केले. कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारी कामगिरी करत १२२ धावांची खेळी साकारून संघाला विजय प्राप्त करून दिला. भारताच्या हातातून निसटलेला सामना कोहलीने आपल्या अप्रतिम खेळीच्या जोरावर खेचून आणला. विराट कोहली हा इंग्लंडच्या विजयासाठी अडथळा आहे. त्याला रोखण्यासाठी इंग्लंडला आपल्या गोलंदाजी योजना बदलावी लागणार असल्याचे जो रुट म्हणाला.

इंग्लंडचा कर्णार इऑन मॉर्गन यानेही सामना झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना आम्ही विराट कोहलीला त्वरित बाद करण्यासाठी झटत होतो, पण दुसऱया बाजूने केदार जाधव याने शतक झळकावून आम्हाला अनपेक्षित धक्का दिला असे विधान केले होते. केदार जाधवने या सामन्यात केवळ ६५ चेंडूत तुफानी शतकी खेळी साकारली. संघाला विजयासाठी ६० धावांची गरज असताना कोहली आणि केदार तंबूत दाखल झाले होते. पण त्यानंतर हार्दिक पंड्याने आपली उपयुक्तता सिद्ध करत नाबाद ४० धावांची खेळी साकारून विजयावर शिक्कामोर्तब केले.
गुरूवारी कटक येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर जो रुट याने मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय फलंदाजांच्या मुख्यत्वे विराट कोहलीच्या फलंदाजीतील कमकुवत बाजू आम्हाला हेरण्याची गरज आहे. पहिल्या सामन्यात आम्हाला इतकी दमदार सुरूवात मिळवून देखील अखेरीस पराभवला सामोरे जावे लागले हे खूप दुर्देवी आहे, असे जो रुट म्हणाला. कोहलीसारख्या फलंदाजाला बाद करण्याची क्लुप्ती शोधून काढण्याची गरज आहे. तो अतिशय घातक फलंदाज आहे. त्यामुळे आमच्या गोलंदाजांना योजना तयार करण्याची गरज आहे, असेही रुट पुढे म्हणाला. स्वत: मैदानात उभे राहून संघाच्या विजयासाठी झटत असताना आपल्या सहकारी खेळाडूचा वेळोवेळी आत्मविश्वास वाढविण्याचे काम कोहलीने केले. यामागे त्याचा खूप मोठा विचार होता आणि ते आमच्यासाठी शिकण्यासारखे आहे, असे रुटने सांगितले.

 

कोहली धावांचा पाठलाग करणारा जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचीही कबुली यावेळी जागतिक क्रमवारीत तिसऱया मानांकित जो रुट याने दिली. कोहली धावांचा पाठलाग करताना भन्नाट खेळतो, खरंतर तो दबावाखाळी खेळताना धावांचा पाठलाग करणारा सर्वोत्तम फलंदाज आहे, हे आपल्याला मान्य करायला हवे. त्याच्या शतकांची आकडेवारीच याची प्रचिती देते. त्याने तब्बल १७ शतके धावांचा पाठलाग करताना ठोकली आहेत, असे रुटने म्हटले.