खेळाडूंच्या व्यवहारासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिफाने बार्सिलोना बंदी घातली होती. या बंदीमुळे बार्सिलोनाला एका वर्षांकरता खेळाडूंना करारबद्ध करता येणार नाही. या बंदीविरोधात बार्सिलोनाने दाद मागण्याचे ठरवले आहे. खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या वयापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंना विकत घेतल्याप्रकरणी बार्सिलोनावर ही कारवाई करण्यात आली आहे. २००९ ते २०१३ या कालावधीत बार्सिलोना व्यवस्थापनाने १८ वर्षांखालील १० खेळाडूंना करारबद्ध केले होते. याप्रकरणी फिफाने स्पॅनिश फुटबॉल महासंघालाही फटकारले आहे.
यासंदर्भात बार्सिलोना फिफासमोर एक निवेदन सादर करणार आहे आणि आवश्यकता भासल्यास स्वतंत्र क्रीडा लवादाकडे हे प्रकरण नेण्याची तयारी असल्याचे बार्सिलोना क्लबने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. फिफाच्या अपील समितीसमोर तीन दिवसांच्या आत दाद मागणे बार्सिलोनाला अनिवार्य आहे.