अखेर फिफा फुटबॉल विश्वचषकातील निर्णयाचा दिवस आला आहे. ब्राझीलऐवजी जर्मनी अंतिम फेरीत पोहोचली आहे. सुरुवातीपासून ब्राझीलला साथ देणाऱ्या सट्टेबाजांना त्यामुळे चांगलाच फायदा झाला. ब्राझीलच्या दिशेनेच अगदी उपांत्य फेरीपर्यंत सट्टा खेळला गेला, नंतरच जर्मनीचा भाव वधारला. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारात जर्मनी आणि अर्जेटिनाच्या भावामध्ये फारसा फरक नाही. पॅडीपॉवर, लाडब्रोक्स, बेट ३६५, स्काय बेट आदी संकेतस्थळांनी या दोन्ही संघांना समान संधी असल्यासारखा भाव दिला आहे. भारतीय सट्टाबाजारातही तीच परिस्थिती आहे. मात्र तूर्तास तरी जर्मनीच्या बाजूने ६५ पैसे आणि अर्जेटिनासाठी सव्वा रुपया भाव देऊ करण्यात आला आहे. सामना सुरू होईल तसा भावही खाली वर येईल, असे सट्टेबाजांना वाटते. पहिल्या ४५ मिनिटांसाठी वेगळा भाव तर उर्वरित खेळासाठी वेगळा भाव सध्या सुरू आहे. निर्धारित वेळेत एकही गोल होणार नाही, यासाठीही सट्टा लावण्यात आला आहे. पेनल्टी शूटआउटमध्ये जर्मनी विजयी होईल, यासाठी ४५ पैसे देऊ करण्यात आले आहेत. अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी हाच सर्वोत्तम खेळाडू असेल, यासाठीही ६५ पैसे देऊ करण्यात आले आहेत. कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगेझ याचा सर्वाधिक गोलकर्ता होण्याचा मान अंतिम सामन्यात जर्मनीचा थॉमस म्युलर हिरावून घेईल, या दिशेनेही सट्टेबाजांनी भाव देऊ केला आहे. एकूणच जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी सर्वच तयार आहेत.
आजचा भाव :
जर्मनी    अर्जेटिना
६५ पैसे (८/११)    सव्वा रुपया (११/१०)
सामना निर्धारित वेळेत अनिर्णीत : ८५ पैसे (९/११)
पहिल्या ४५ मिनिटांत गोल : ५५ पैसे (५/८)
पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय :
जर्मनी    अर्जेटिना
३५ पैसे     ९० पैसे.
निषाद अंधेरीवाला
सागरी सॉकर!
विश्वचषक स्पर्धेच्या महामुकाबल्याचा थरार हिरवळीच्या कॅनव्हासवर रंगतो. या मुकाबल्याची विविध प्रारूपे सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहेत. दोन देशांच्या रोबोंदरम्यानच्या फुटबॉलचे वृत्त ताजे असतानाच सागरी जीवसृष्टीच्या सान्निध्यात डायव्हिंगपटूंचा मुकाबला रंगला. ब्राझीलपासून दूर फिलिपिन्समधल्या आशिया खंडातील सर्वात मोठे मत्स्यालय असणाऱ्या मनिला ओशन पार्कमध्ये हा सागरी फुटबॉल मुकाबला खेळला गेला. जर्मनी आणि अर्जेटिनाची जर्सी परिधान केलेल्या डायव्हिंगपटूंनी एक मैत्रिपूर्ण लढत खेळली. फुटबॉलची जर्सी, नाकाला ऑक्सिजन मास्क, पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर आणि मासे अशा निळाई वातावरणात हा सामना खेळला गेला. या लढतीत कोण जिंकले, यापेक्षाही  हिरवळीपासून ते पाण्यापर्यंत व्याप्ती असलेले फुटबॉलचे वेड पुन्हा एकदा
प्रत्ययास आले.

रविवारी अर्जेटिना आणि जर्मनी यांच्यात होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे पडघम पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावरही उमटले आहेत. सुदर्शन पटनायक यांनी वाळूत रेखाटलेले हे शिल्प सर्वाचे लक्ष वेधत आहे.