द.आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दोनशे धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. पण गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे पाहुण्यांनी यजमानांचे आव्हान गाठले. तर, कटक येथील सामन्यात टीम इंडियाचा डाव अवघ्या ९२ धावांवर गडगडला आणि दुसरा ट्वेन्टी-२० सामना सहजगत्या जिंकून द.आफ्रिकेने ट्वेन्टी-२० मालिका खिशात घातली.  तिसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकून मालिकेत प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. आधीच्या दोन सामन्यांत झालेल्या चुका टाळून तिसरा सामना जिंकण्यासाठी पुढील पाच गोष्टी भारतीय संघाला अंमलात आणाव्या लागतील.

१. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय-
सामन्याच्या नाणेफेकीचा कौल कर्णधाराच्या हातात नसला तरी नाणेफेक जिंकून कर्णधाराने घेतलेला निर्णय सामन्याचा निकालात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तिसऱया ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यास धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणे योग्य ठरू शकते. द.आफ्रिकेच्या संघात भरभक्कम फलंदाजांचा भरणा असल्याने त्यांच्यासाठी नेमके किती धावांचे आव्हान योग्य ठरेल हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. द.आफ्रिकेने याआधी २०० हून अधिक धावांचेही आव्हान गाठले आहे. महत्त्वाचीबाब म्हणजे ही मालिका सुरू होण्याआधी सराव सामन्यात भारताच्या ‘अ’ संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करीत द.आफ्रिकेने दिलेले आव्हान गाठले होते. तर, पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली पण त्याचा कोणताही फायदा संघाला झालेला नाही.

भारत, टी-२०
भारताने द.आफ्रिकेच्या विरुद्धच्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकलेला नाही.

२. सुरूवात भक्कम व्हावी..
पहिल्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यात भारताची पहिली विकेट संघाच्या धावसंख्येने ३० चा आकडा गाठण्याआधीच पडली. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही भारताची सध्याची सलामी जोडी भक्कम असली तरी आजच्या सामन्यात दमदार सुरूवात भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल. संघाची सुरूवात चांगली झाली तर, पुढे धोनी आणि रैनाला शेवटच्या षटांकात धावसंख्येला चांगला आकार देता येईल.

३. चपळता हवी-
ट्वेन्टी-२० सारख्या उत्कंठावर्धक सामन्यांत फलंदाजांनी चपळ आणि सहकारी फलंदाजाच्या सातत्याने संपर्कात असणे अत्यंत आवश्यक असते. मर्यादित षटकांच्या सामन्यात धावचित होणे किंवा सहकारी फलंदाजाला आपल्यामुळे धावचित बाद व्हावे लागणे हे अतिशय घातक ठरते. भारतीय संघाला पहिल्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत ४ विकेट्स धावचित होऊन गमवाव्या लागल्या. यातील तीन विकेट्स या संघाच्या टॉप ऑर्डरमधील होत्या. कोहली, धवन या महत्त्वाच्या फलंदाजांच्या विकेट्स धावचित होऊन गेल्याने संघ बॅकफूटवर आला होता. सहकारी फलंदाजाशी उत्तम संवाद ठेवून चपळतेने घेतलेल्या धावा सामन्यासाठी निर्णायक ठरतात. धावचित होण्याच्या घटना टाळता येण्याजोग्या आहेत. त्याची काळजी संघाने आजच्या सामन्यात घ्यायला हवी.

भारत, धावचित, द.आफ्रिका, टी-२०
द.आफ्रिकेविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताने चार विकेट्स धावचित होऊन गमावल्या.

४. फलंदाजी क्रम-
भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमाबाबत आजही कर्णधार धोनीसह संघाचे मार्गदर्शक आणि क्रिकेट विश्लेषक साशंक आहेत. निर्णायक क्षणी संघासाठी विजयश्री खेचून आणण्याचे धोनीचे सामर्थ्य असल्याने त्याचे स्थान बदलता येण्याजोगे नाही. पण सहाव्या स्थानासाठी आश्वासक फलंदाज तयार होण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे सांगत फलंदाजीच्या वरच्यापट्टीला स्थिरता आणण्यासाठी सहावे स्थान सोडून वर फलंदाजीला येण्याची इच्छा धोनीने याआधी व्यक्त केली आहे. त्यामुळे संघातील चौथ्या स्थानात बदल करून पाहण्यास तरी सध्या हरकत नाही. धोनी, अंबाती रायुडू किंवा अजिंक्य रहाणेचा त्यासाठी विचार केला जाऊ शकतो.

५. अमित मिश्राला संधी-
गेल्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत अक्षर पटेलची गोलंदाजी अपेक्षित यश संघाला देऊ शकलेली नाही. फिरकी गोलंदाजीची मदार आर.अश्विन एकटाच सांभाळत आहे. तर, हरभजननेही दुसऱया टी-२० सामन्यात द.आफ्रिकी फलंदाजांना नियंत्रणात ठेवले होते. पण अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर द.आफ्रिकेचे फलंदाज सहज धावा घेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अक्षरच्या जागी अमित मिश्राचा विचार केला जाऊ शकतो. पण, द.आफ्रिकेच्या मधल्या पट्टीत डावखुऱया फलंदाजांचा भरणा असल्याने अमित मिश्राची निवड करणे जरा जोखमीचे असले तरी मिश्राचा अनुभव कामी येऊ शकतो.

हरभजन, अश्विन, अमित मिश्रा
तिसऱया ट्वेन्टी-२० सामन्यात अक्षर पटेल ऐवजी अमित मिश्राला संधी देण्यास हरकत नाही.