क्रीडा साहित्यावरील कर पाच पट वाढणार

लोकसभेत मंजूर झालेला वस्तू व सेवा कराला (जीएसटी) राज्य सरकारनेही हिरवा कंदील दाखवला आहे. या विधेयकामुळे केंद्रीय अबकारी कर, राज्याचा मूल्यवर्धित कर (व्हॅट), करमणूक कर, जकात, प्रवेश कर, चैनीच्या वस्तूवरील कर आणि खरेदी कर यांपासून सामान्य ग्राहकांची सुटका होणार असून त्यांना केवळ एकच कर भरावा लागणार आहे. मात्र, या वस्तू व सेवा करामुळे क्रीडा क्षेत्राला महागाईचे ग्रहण लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. जीएसटीमुळे क्रीडा साहित्याच्या किमती २ ते ५ पटींनी वाढणार असल्याचे, महाराष्ट्र स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिटनेस ट्रेड असोसिएशनकडून सांगण्यात येत आहे.

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील भारताच्या कामगिरीवर चिंता व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील दोन ऑलिम्पिक स्पर्धातील देशाची कामगिरी सुधारण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना केली. तसेच क्रीडा क्षेत्राकडे युवकांनी वळावे यासाठी विविध योजनाही आखल्या जात आहेत, परंतु जीएसटी कर लागू झाल्यानंतर या प्रयत्नांना एकप्रकारे खीळ बसणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.  महाराष्ट्र स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिटनेस ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर वागळे म्हणाले की, ‘‘भारतीय व्यापार वर्गीकरणानुसार क्रीडा साहित्याचा कलम ९५ मध्ये समावेश आहे. याच्या उपकलमात शारीरिक कसरतीत मोडणारे जिम्नॅस्टिक्स, मैदानी खेळ यांचा समावेश होतो. जीएसटीनुसार या खेळांच्या साहित्यावर २८ टक्के कर लावण्यात येणार आहे. त्यामुळे क्रीडा साहित्याच्या किमतीत झपाटय़ाने वाढ होणार आहे आणि त्याचा भरुदड खेळाडूंना सहन करावा लागणार आहे.’’

उदा. आता १०० रुपयांच्या क्रीडा साहित्यावर दोन टक्के अबकारी + २ टक्के व्यावसायिक कर (सीएसटी)+ ३ टक्के जकात अशी एकूण ती वस्तू दुकानदाराला १०७ रुपयांमध्ये पडते आणि तो ती १३० रुपये + ६ टक्के मूल्यवर्धित करासह १३८ रुपयाला ग्राहकाला विकतो.

आता जीएसटीमुळे हे सर्व कर रद्द झाले तरी १०० (त्या वस्तूची किंमत कमी करण्याचा युक्तिवाद करण्यात येत असला तर ती ९० रुपये होईल). त्या ९० रुपयांवर २८ टक्के जीएसटी तर ती वस्तु दुकानदाराला ११५ रुपयाला मिळाली. ती त्याने १३० रुपये + २८ टक्के जीएसटी अशा दराने ग्राहकाला विकल्यास त्याची किंमत १६६ रुपये होईल. त्यामुळे आधी जी वस्तू १३८ रुपयांना ग्राहकाला मिळणार होती त्यासाठी अतिरिक्त २८ रुपये मोजावे लागणार आहेत.

मुख्यमंत्री, अर्थमंत्री, क्रीडामंत्र्यांकडे गाऱ्हाणे

क्रीडा साहित्यावरील वाढणाऱ्या करामुळे खेळाडूंना आर्थिक भार सहन करावा लागणार आहे आणि त्यामुळे क्रीडा क्षेत्राची वाटचाल अधोगतीकडे होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिटनेस ट्रेड असोसिएशनचे मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकडे लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.

untitled-1