शारीरिक, मानसिक विकलांग, विविध दुर्धर आजाराने शोषित झालेल्यांकडून मला आजपर्यंत जीवनात समर्थपणे उभे राहण्याची प्रेरणा मिळाली आहे आणि माझ्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांच्यामध्ये राहिल्यानंतरच मला खूप मानसिक समाधान मिळते, असे भारताचा विक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने येथे सांगितले.
एरवी क्रिकेटच्या खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर आक्रमक फटकेबाजी करीत मैदान दणाणून सोडणारा सचिन हा सामाजिक बांधिलकीचे ऋण फेडताना किती हळवा होतो याची प्रचिती येथे रविवारी पाहावयास मिळाली. अनाथ बालकांचे संगोपन करणाऱ्या ‘सोफोश’ या संस्थेच्या मदतीसाठी मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेने सचिनच्या उपस्थितीत निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सचिन देखील समाजोपयोगी कार्यक्रम करताना किती मनमुरादपणे आनंदी होतो याचा प्रत्यय पाहावयास मिळाला.
सचिनच्या दुसऱ्या इनिंगविषयी क्रीडा समालोचक सुनंदन लेले यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने दिलखुलासपणे उत्तरे दिली. दृष्टिहीन, विकलांग, मरणाच्या दारात असलेल्या मुलांना भेटताना मला जीवनाचे खरे सार कळते, असे सांगून सचिन म्हणाला, मरणाच्या उंबरठय़ावर असलेल्या मुलांना भेटताना मला खूप रडू येते. मला माहीत असते, की त्यांच्या जीवनाचे अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. तरीही त्यांच्याशी गप्पागोष्टी करताना त्यांची स्वप्ने जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी मी प्रयत्न करतो. ज्यांच्याकडे सर्व काही सुखसमृद्धी आहे, असे लोकही जेव्हा स्वत:च्या जीवनाविषयी तक्रार करीत असतात, अशा लोकांनी या मुलांकडे, शोषितांकडे पाहिल्यास आपण किती सुखी आहोत याची जाणीव त्यांना होईल.
लोक आम्हाला हीरो मानतात, मात्र देशाचे संरक्षण करणारे जवान, लोकांचे संरक्षण करणारे पोलीस हेच खरे हीरो आहेत. अहोरात्र कोणतीही तक्रार न करता ते त्यांच्यावर असलेली संरक्षणाची जबाबदारी किती हसतमुखाने करीत असतात. सतत वेदना व दु:खे झेलतानाही ते आपल्या चेहऱ्यावर आनंद दाखवत असतात. खरोखरीच त्यांना मानाचा मुजरा दिला पाहिजे. आम्ही लोकांचे केवळ मनोरंजन करीत असतो असे सचिन याने सांगितले.
मुंबईमध्ये हॉटेल ताजजवळ झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे वेळी आम्ही चेन्नईत इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळत होतो. त्या दु:खद घटनेच्या दडपणाखाली खेळताना आम्ही पहिले तीन दिवस पराभवाच्या छायेतच वावरत होतो. मात्र नंतर झहीरखान याची प्रभावी गोलंदाजी व त्यानंतर राहुल द्रविड-व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांनी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर आम्ही सामना जिंकला. हा विजय म्हणजे मुंबईतील अतिरेकी कारवायानंतर भारतीय लोकांना दु:ख विसरण्यासाठी दिलेला आनंदी क्षण होता. तसेच हा विजय म्हणजे अतिरेकी कारवायात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजलीच होती असेही सचिन याने सांगितले.
या समारंभात सचिन याने ‘सोफोश’ संस्थेकरिता दानशूर व्यक्तींनी निधी द्यावा असे आवाहन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध व्यावसायिकांनी मिळून दीड कोटी रुपयांचा निधी जमविला. ‘सोफोश’ संस्थेचे अध्यक्ष शाम मेंहेदळे यांना सचिनच्या हस्ते या निधीचा धनादेश देण्यात आला. या वेळी मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुधीर दरोडे व एबील फाउंडेशनचे विश्वस्त अमित भोसले हेही उपस्थित होते.