विराट कोहली आणि केदार जाधव यांच्या अद्भुत शतकी खेळींच्या बळावर पहिल्या लढतीत विजय मिळवलेला भारतीय संघ कटक येथे एकदिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

४ बाद ६३ अशा स्थितीतून भारतीय संघाने साडेतीनशे धावांचे डोंगराएवढे लक्ष्य पेलले. धावांची टांकसाळ उघडणारा विराट कोहली आणि घरच्या मैदानावर वेगवान खेळी करणारा केदार जाधव या विजयाचे शिल्पकार ठरले. इंग्लंडने साडेतीनशे धावांची मजल मारत आश्वासक सुरुवात केली. या मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था ४ बाद ६३ अशी झाली. मात्र विराट आणि केदारच्या विक्रमी भागीदारीच्या बळावर भारताने थरारक विजय साकारला.

तांत्रिक कारणांमुळे भारतीय संघ कटकमध्ये केवळ एक दिवस आधीच पोहोचला आहे. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ भारतीय संघाला मिळालेला नाही. सलामीवीर शिखर धवनचे पुनरागमन यशस्वी ठरले नाही. युवा लोकेश राहुलही झटपट तंबूत परतला होता. अनुभवी फलंदाज युवराज सिंगने दमदार सुरुवात केली मात्र तोही मोठी खेळी करू शकला नाही. निव्वळ फलंदाज म्हणून खेळणारा महेंद्रसिंग धोनीही मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. या चारही जणांकडून संयमी खेळाची अपेक्षा आहे. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्याजागी अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार होऊ शकतो. कोहलीच्या खांद्यावर नेहमीप्रमाणे जबाबदारी असून, केदार जाधवला आपण एका सामन्याचा चमत्कार नाही हे सिद्ध करावे लागेल.

कसोटी मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवणारा रविचंद्रन अश्विन पहिल्या लढतीत सपशेल निष्प्रभ ठरला होता. उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी विकेट मिळवल्या, मात्र धावा रोखण्यात ते अपयशी ठरले. रवींद्र जडेजा टिच्चून गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे, मात्र सलामीच्या लढतीत त्याच्याही गोलंदाजीवर इंग्लंडने प्रहार केला.

इंग्लंडच्या जेसन रॉय, जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी पहिल्या लढतीत जोरदार टोलेबाजी केली होती. कटक येथील लढतीतही त्यांच्याकडून अशाच वेगवान खेळीची अपेक्षा आहे. कर्णधार इऑन मॉर्गनला लौकिकाला साजेशी खेळी करता आली नव्हती.

अ‍ॅलेक्स हेल्सऐवजी सॅम बिलिंग्जला संधी मिळू शकते. साडेतीनशे धावांचाही बचाव करता न आल्याने इंग्लंडच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. आदील रशीदऐवजी लियाम डॉसनला संधी मिळू शकते. ख्रिस वोक्सऐवजी अनुभवी लियाम प्लंकेट संघात स्थान मिळवू शकतो.

प्रेक्षकांची धास्ती

भारतीय संघाने या मैदानावर ५ ऑक्टोबर २०१५ रोजी ट्वेन्टी-२० सामना खेळला होता. भारतीय संघाने हा सामना गमावला होता. खिलाडूवृत्तीच्या अभावामुळे प्रेक्षकांनी खेळाडूंच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या होत्या. असा अनुचित प्रसंग टाळण्यासाठी प्रेक्षकांना पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. मैदानात पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साडेतीनशेहून अधिक पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

खेळपट्टी

सामन्याच्या पूर्वसंध्येला खेळपट्टीवर गवताचा थर आहे. तो कायम राहिल्यास वेगवान गोलंदाजांना साहाय्य मिळू शकते. संध्याकाळनंतर दवाचा मुद्दा निर्णायक ठरू शकतो त्यामुळे नाणेफेकीचा कौल विजयाची नांदी ठरू शकते. मैदानाचा आकार लहान असल्याने हा सामनाही प्रचंड धावसंख्येचा ठरण्याची शक्यता आहे.

 

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्रा.
  • इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, अ‍ॅलेक्स हेल्स, जो रूट, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदील रशीद, जेक बॉल, लियाम डॉसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, लियाम प्लंकेट.
  • भारत- इंग्लंड आज दुसरा एकदिवसीय सामना
  • वेळ : दुपारी १.३० पासून; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर