संदीप कीर्तने माजी डेव्हिसपटू व प्रशिक्षक

ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धापेक्षा डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेची संस्कृती खूपच वेगळी असते. तेथे अनुभवी खेळाडूंप्रमाणे नवोदित खेळाडूंनाही भरपूर शिकायला मिळते, हे लक्षात घेता पुण्याला पुन्हा या स्पर्धेतील सामन्याचे संयोजनपद मिळाले, ही उदयोन्मुख खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. त्याचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे, असे माजी डेव्हिसपटू व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप कीर्तने यांनी सांगितले.

न्यूझीलंडविरुद्ध फेब्रुवारीत होणारी डेव्हिस चषक लढत आयोजित करण्याचा मान पुण्याला मिळाला आहे. ही लढत शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहे. डेव्हिस चषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अनेक वेळा अनपेक्षित निकालांची नोंद केली आहे. संदीप यांनी स्वत: डेव्हिस चषक लढतीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ते स्वत: पुण्याचे असल्यामुळे त्यांच्या दृष्टीनेही डेव्हिस लढत महत्त्वाची आहे. या लढतीविषयी आणि एकूण टेनिसविषयी संदीप यांच्याशी केलेली केलेली खास बातचीत –

  • डेव्हिस लढत बऱ्याच वर्षांनी पुण्यात होत आहे. त्याबाबत काय सांगता येईल?

आम्हा सर्वासाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट  आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये पुणे शहर हे चेन्नई, नवी दिल्ली, बंगळुरू याप्रमाणेच टेनिसचे एक प्रमुख शहर होत चालले आहे. या ठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना मानांकन गुणांसाठी होत असतो. या शहरात गेली तीन वर्षे आपल्याकडे एटीपी व आयटीएफ स्पर्धाही होत आहेत. त्याच्या यशस्वी संयोजनामुळेच डेव्हिस लढतीची संधी पुणेकरांना मिळाली आहे.

  • या लढतीद्वारे पुणेकरांना कसा फायदा होणार आहे?

डेव्हिस लढतीशी निगडित असलेला प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. अगदी बॉलबॉइजदेखील खूप काम करीत असतात. बॉलबॉइज म्हणून काम करणे ही काही दुय्यम दर्जाची गोष्ट नाही. बॉलबॉइजमधूनही अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारकीर्द केली आहे. क्रिकेटमध्ये अनेक शाळकरी किंवा महाविद्यालयीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळी भारतीय किंवा परदेशी खेळाडूंना चेंडू टाकण्याची संधी मिळत असते. तशी संधी डेव्हिस लढतीत उपयोगी असते. परदेशी खेळाडूंप्रमाणेच भारतीय संघातील खेळाडूंबरोबरही बोलण्याची संधी पुण्याच्या टेनिसपटूंना मिळणार आहे. त्याचप्रमाणे स्वयंसेवक व प्रेक्षक या भूमिकेतूनही त्यांना परदेशी खेळाडूंचे कौशल्य अगदी जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

  • ग्रॅण्ड स्लॅमपेक्षा डेव्हिस लढतीचे वातावरण खूप वेगळे असते. त्याविषयी तुझा अनुभव कसा होता?

कारकीर्दीत एकदा तरी डेव्हिस चषक लढत खेळण्याची संधी मिळावी हे माझे स्वप्न होते आणि ते स्वप्न १९९७ मध्ये साकार झाले. चिलीविरुद्ध नवी दिल्ली येथे झालेल्या डेव्हिस लढतीच्या वेळी भारतीय संघात माझी निवड झाली होती. चिली संघाकडून खेळणारा मार्सेलो रिओस हा त्या वेळी जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू होता. भारतीय संघात लिएण्डर पेस व महेश भूपती हे अव्वल दर्जाचे खेळाडू होते. टेनिस कोर्टवर तिरंगा फडकताना व आपले राष्ट्रगीत वाजत असतानाचा तो क्षण माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. डेव्हिस लढतीमधील प्रत्येक सामन्याचे वेळी व्यूहरचना ठरवताना संघाचे प्रशिक्षक व न खेळणारे कर्णधार संघातील सर्वच खेळाडूंशी चर्चा करूनच निर्णय घेत असतात. प्रत्येकाला आपले मत व विचार मांडण्याची तेथे संधी असते. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये असे क्षण कधीच येत नसतात. त्यामुळेच डेव्हिस लढतीमधील वातावरण खूप वेगळे, परंतु सुखकारक असते.

  • न्यूझीलंडविरुद्ध आपल्याला विजयाची कितपत संधी आहे ?

शिवछत्रपती क्रीडानगरीतील हार्ड कोर्टवर हे सामने होणार आहेत. भारताने गतवर्षी ख्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडला ३-२ असे हरवले होते. तेथे आपल्या संघाने प्रतिकूल वातावरणात विजय मिळवला होता. पुण्यातील लढतीत घरच्या वातावरणात व प्रेक्षकांच्या प्रोत्साहनात खेळण्याचा लाभ भारतीय खेळाडूंना मिळणार आहे. युकी भांब्री, सोमदेव देववर्मन यांच्याबरोबरच सुमीत नागल, साकेत मायनेनी, रामकुमार रामनाथन, प्रजनिश गुणशेखरन यांच्यासारखे युवा खेळाडू चांगली व सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत. हे खेळाडू भारताला विजय मिळवून देतील अशी मला खात्री आहे.