भारतामधील अव्वल दर्जाची स्पर्धा म्हणून लोकप्रियता मिळवलेली भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा यंदा ऐन परीक्षेच्या कालावधीत होणार असल्यामुळे खो-खो संघटकांमध्ये नाराजी पसरली आहे.

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनतर्फे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. गेली काही वर्षे राज्य शासनातर्फे ही स्पर्धा पुरस्कृत केली जात असल्यामुळे शक्यतो आपल्या गावात ही स्पर्धा आयोजित करण्याचा राज्य क्रीडा मंत्र्यांचा प्रयत्न असतो. या स्पर्धेसाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येतो. ही तरतूद मार्च महिन्याअखेपर्यंतच असते. जर संबंधित आर्थिक वर्षांत ही स्पर्धा आयोजित केली गेली नाही, तर हा निधी अन्य तरतुदींकरिता वळवला जातो. एक-दोन वेळा हा निधी खो-खो खेळासाठीच खर्च व्हावा, यासाठी घाईघाईने मार्चमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत भाग घेणारे बरेचसे खेळाडू शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणारे असल्यामुळे शक्यतो परीक्षांच्या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करू नये अशीच सर्व संघांच्या प्रशिक्षकांची विनंती असते. यंदा जानेवारीत ही स्पर्धा घ्यावी, असा राज्य संघटनेने आग्रह धरला असला तरी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात ही स्पर्धा नागपूर येथे घेण्याबाबत राज्य शासनाचा आग्रह असल्याचे समजते. तसे झाल्यास अनेक नैपुण्यवान खेळाडूंना परीक्षेच्या कारणास्तव या प्रतिष्ठेच्या स्पर्धेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवडला खो-खो लीग होणार
राज्य संघटनेने राज्यस्तरावर खो-खो लीग आयोजित करण्याचे निश्चित केले असून पहिली लीग आयोजित करण्याचा मान पिंपरी-चिंचवड शहराला मिळणार आहे. या महानगरपालिकेतर्फे घेतली जाणारी महापौर चषक स्पर्धाच लीग स्वरूपात होणार आहे. या लीगमध्ये मुंबई, पुणे, सांगली, सातारा आदी ठिकाणचे संघ सहभागी होतील. प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर अखिल भारतीय स्तरावर लीग आयोजित करण्याची तयारीही राज्य संघटनेने दर्शवली आहे. मात्र ही स्पर्धा अखिल भारतीय खो-खो महासंघानेच स्वत: आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.