ईडन गार्डन्सच्या मैदानात झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. कोहली बाद होताच कोलकाताच्या चाहत्यांचा एकच जल्लोष सुरू झाला. पण आपल्याला पहिल्याच चेंडूवर बाद व्हावे लागल्यानंतर कोहली भलताच संतापला होता. कव्हर्समध्ये फटका मारताना कोहलीच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू थर्ड स्लिपच्या हातात विसावला आणि कोहलीला माघारी परतावे लागले. मात्र, बाद झाल्यानंतर कोहलीने मैदानावरच संताप व्यक्त केला. गोलंदाज चेंडू टाकत असताना अचानक ‘साईट स्क्रिन’समोरून चाहता चालत गेल्याने कोहलीचे लक्ष विचलित झाले होते. कोहलीने झालेल्या प्रकारावर पॅव्हेलियनमध्ये परत येत असताना राग व्यक्त केलाच, पण सामनाधिकाऱ्यांना बोलावून याचा जाब विचारला. सामनाधिकाऱ्यांनी कोहलीची समजूत काढून ‘साईट स्क्रिन’बद्दल तात्काळ काळजी बागळण्याचे आश्वासन दिले. कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात बेंगळुरूला तब्बल ८२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. बेंगळुरूचा एकही फलंदाजी दोन अंकी आकडा गाठू शकला नाही. बेंगळुरूचा संपूर्ण संघ ४९ धावांवर गारद झाला.

सामना झाल्यानंतर विराट कोहलीला याबाबत विचारण्यात आले होते. ”स्टेडियमची ‘साईट स्क्रिन’ एकतर आधीच खूप लहान होती. त्यात एक प्रेक्षक अगदी गोलंदाजाच्या मागे चालताना मला दिसला आणि लक्ष विचलित झाले होते. पण ती आमची पहिलीच विकेट होती. त्यामुळे संघाच्या वाईट कामगिरीचे खापर त्यावर फोडता येणार नाही. नक्कीच संघाने यावेळी अत्यंत वाईट कामगिरीची नोंद केली आणि याचे मला दु:ख आहे”, असे कोहली म्हणाला.