आजपासून तामिळनाडूविरुद्ध सामना
पंजाबविरुद्ध डावाने विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला मुंबईचा संघ गुरुवारपासून वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार अकादमीच्या मैदानावर सुरू होणाऱ्या रणजी सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

आंध्र प्रदेशविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात फक्त एक गुण मिळवणाऱ्या मुंबईने वानखेडेवर पंजाबला एक डाव आणि १२ धावांनी पराभूत केले. त्यामुळे मुंबईच्या गुणतालिकेत आणखी ७ गुणांची भर पडली. या सामन्यात श्रेयस अय्यरने शानदार द्विशतकी खेळी साकारली. तसेच आदित्य तरे आणि सूर्यकुमार यादव यांनीही दमदार फलंदाजी करीत त्याला साथ दिली. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि कामचलाऊ फिरकी गोलंदाज अखिल हेरवाडकर यांनी कर्तृत्व दाखवले.

गेले दोन महिने दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेल्या मुरली विजयवर तामिळनाडूची मदार असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टीने तो या सामन्याचा विचार करीत आहे. श्रीलंकेतील पहिली व तिसरी कसोटी विजयला दुखापतीमुळे खेळता आली नव्हती. मात्र दुसऱ्या कसोटीत त्याने अनुक्रमे ० व ८२ धावा केल्या होत्या.