* आर. अश्विनचे ८८ धावांत ६ बळी
* क्लार्कच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
* ऑस्ट्रेलियाची ७ बाद ३१६ अशी समाधानकारक धावसंख्या
चेन्नईत फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडकविण्यासाठी भारताने रचलेली व्यूहरचना प्रारंभी यशस्वी ठरली होती. चेपॉकच्या घरच्या मैदानावर लाडका चॉकलेट हीरो रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ फक्त दीडशे धावांत तंबूत पाठवून आशादायी चित्रही रेखाटले होते, पण ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्कने भारताचे हे चित्र पूर्ण होऊ दिले नाही. पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर क्लार्क दिवसअखेपर्यंत लढला. रवींद्र जडेजाच्या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर क्लार्कने पुढे सरसावून लाँग-ऑफला चौकार ठोकला आणि आपले शानदार शतक साजरे केले. त्याने पदार्पणवीर मोझेस हेन्रिक्ससोबत महत्त्वाची भागीदारी रचून संघाचा डाव सावरला. त्यामुळेच पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला ७ बाद ३१६ अशी समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
गतवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेत ०-४ अशा फरकाने सपाटून मार खाल्ला होता. क्लार्कच्या नेतृत्वाखाली तो भीमकाय पराक्रम कांगारूंनी दाखविला होता. त्या मालिकेत क्लार्कने त्रिशतक आणि द्विशतकासह चार कसोटी सामन्यांत एकंदर ६२६ धावांची बरसात करीत मालिकावीर पुरस्कारही जिंकला होता. क्लार्क भारताविरुद्ध आपला तोच आवेश राखत खेळताना जाणवला. क्लार्कने आपल्या कसोटी कारकीर्दीतील २३वे शतक साजरे केले. याचप्रमाणे सात हजार कसोटी धावांचा टप्पा ओलांडण्याची किमया साधली. १६९ चेंडूंत (११ चौकार) १०३ धावांवर तो खेळत आहे. चेपॉकवर पहिल्या दिवशी अश्विनने राज्य करीत ३० षटकांत ८८ धावांत ६ बळी घेतले. परंतु क्लार्कने आपल्या झुंजार खेळीनिशी ते यश झाकोळून टाकले.
सकाळच्या सत्रात डेव्हिड वॉर्नरने धडाकेबाज ५९ धावांची खेळी केली. मग क्लार्कने पदार्पणवीर मोझेस हेन्रिक्स (६८) सोबत सहाव्या विकेटसाठी १४७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अखेर अश्विननेच हेन्रिक्सला पायचीत करीत ही जोडी फोडली. अश्विनने सहाव्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधली. डीआरएसच्या अनुपस्थितीमुळे क्लार्कला शुक्रवारी जीवदान लाभले. अन्यथा अश्विनच्या खात्यावर आणखी एक बळी जमा झाला असता. ऑस्ट्रेलियाचा कप्तान ३९ धावांवर असताना शॉर्ट लेगला उभ्या चेतेश्वर पुजाराने क्लार्कचा बॅट-पॅड झेल टिपला, परंतु पंच कुमार धर्मसेना यांनी कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने दिला. चेंडूने क्लार्कच्या बॅटची कड घेतली होती, हे टेलीव्हिजन रिप्लेमध्ये नंतर स्पष्ट झाले.

आणखी ३० धावांत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळू -आर. अश्विन
चेन्नई : ‘‘मायकेल क्लार्कला बाद दिले असते तर ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येत ६०-७० धावांनी कपात झाली असती. पण क्रिकेटमध्ये असे घडतेच. हा खेळाचाच एक भाग असतो. शनिवारी सकाळी ऑस्ट्रेलियाचा डाव आम्ही आणखी २०-३० धावांमध्ये गुंडाळू,’’ असा आशावाद फिरकी गोलंदाज आर. अश्विनने प्रकट केला.
‘‘क्लार्कच्या बॅटला चेंडू लागल्याचे मला स्पष्टपणे दिसले म्हणून मी अपील केले. पंच कुमार धर्मसेना हे स्वत: एक ऑफ-स्पिनर आहेत. ते योग्य पद्धतीने कौल देतील, अशी आमची अपेक्षा होती. पण दिवसअखेर जेव्हा या गोष्टींचा आम्ही विचार करतो, तेव्हा क्रिकेटमध्ये असे घडते, हे पटते,’’ असे अश्विन सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

क्लार्कच्या सोबतीमुळे दडपण कमी झाले – हेन्रिक्स
चेन्नई : ‘‘फिरकी गोलंदाजी खेळण्याची मायकेल क्लार्कची पद्धत वेगळी आहे. खेळपट्टीवर तो सहजगत्या फिरकी गोलंदाजांचा सामना करीत होता. मायकेलप्रमाणेच फिरकी खेळण्याचा मी प्रयत्न केला नाही. क्लार्क सोबतीला असल्यामुळे माझे दडपण कमी झाले आणि मी निर्धाराने खेळलो,’’ असे मत पदार्पणवीर मोझेस हेन्रिक्सने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
‘‘शनिवारी दुसऱ्या दिवसाचा तासाभराचा खेळ महत्त्वाचा असेल. सध्या तरी परिस्थिती दोन्ही संघांसाठी अनुकूल आहे. मायकेल हा अद्वितीय फॉर्मात आहे आणि तो द्विशतक साजरे करील अशी अपेक्षा आहे,’’ असे हेन्रिक्स म्हणाला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : इडी कोवन यष्टिचीत धोनी गो. अश्विन २९, डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. अश्विन ५९, फिल ह्य़ुजेस त्रिफळा गो. अश्विन ६, शेन वॉटसन पायचीत गो. अश्विन २८, मायकेल क्लार्क खेळत आहे १०३, मॅथ्यू व्ॉड पायचीत गो. अश्विन १२, मोझेस हेन्रिक्स पायचीत गो. अश्विन ६८, मिचेल स्टार्क त्रिफळा गो. जडेजा ३, पीटर सिडल खेळत आहे १, अवांतर (लेगबाइज- ७) ७, एकूण ९५ षटकांत ७ बाद ३१६
बाद क्रम : १-६४, २-७२, ३-१२६, ४-१३१, ५-१५३, ६-३०४, ७-३०७
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ११-१-४८-०, इशांत शर्मा ११-२-४६-०, हरभजन सिंग १९-१-७१-०, आर. अश्विन ३०-५-८८-६, रवींद्र जडेजा २४-५-५६-१.