क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने बुधवारी भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्याचा तडकाफडकी निर्णय जाहीर केला. कर्णधारपद सोडले असले तरी धोनी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये खेळत राहणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यामुळे आता धोनीची जागा कोण घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरोधात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी उद्या टीम इंडियाची निवड होणार आहे. या निवडीसाठी महेंद्रसिंग धोनी उपलब्ध असेल. त्यामुळे एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल, हे उद्याच स्पष्ट होऊ शकेल. विराट कोहलीकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल द्रविडकडून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने २००७ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाला गवसणी घातली. याच काळात कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीतही भारताने अव्वल स्थान पटकावले. मात्र, त्यानंतरच्या काळात धोनीच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली होती. त्यामुळे २०१५ मध्ये धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. कॅप्टन कूल अशी बिरुदावली मिरवणाऱ्या धोनीने २००४मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतरच्या काळात धोनी हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला. महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी ठरलेला कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.