मोटारस्पोर्ट्स हा पुरुषप्रधान खेळ आहे. मला गाडय़ांची, वेगाची आवड आहे. पण मुलगी आहे म्हणून ही आवड सोडायची नव्हती. मुलीही गाडय़ा हाताळू शकतात, जिंकू शकतात हे दाखवून द्यायचे होते. म्हणूनच मोटारस्पोर्ट्स कार्टिगमध्ये मुशाफिरी सुरू झाली. कोल्हापूर येथे सुरू असलेल्या जेके टायर कार्टिग अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने देशातली एकमेव कार्टिगपटू असलेल्या १६ वर्षीय मीरा इरडाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘पहिल्यांदा शर्यतीत सहभागी झाले तेव्हा मनात धाकधूक होती. आयोजक, तांत्रिक अधिकारी, गाडीचे तंत्रज्ञ, प्रशिक्षक आणि प्रतिस्पर्धी सगळेच पुरुष. आपल्याला स्वीकारले जाईल का याविषयी साशंकता होती. शर्यतीत मला आगेकूच करता येऊ नये म्हणून त्यांनी आक्रस्ताळा खेळ केल्यास काय करायचे असा प्रश्नही पडला होता. सुरुवातीला मला खेळापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न झाले. मला पाहून पुरुष स्पर्धकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असे. मात्र पुरुषी मानसिकतेला टक्कर देत वाटचाल केली. माझा संघ भक्कमपणे माझ्या पाठीशी असतो,’ असे मीराने सांगितले.

‘मुलगी आहे म्हणून विशेष वागणूक मिळावी असे मला कधीही वाटत नाही. पुरुष स्पर्धकांना जे नियम आहेत तेच मलाही लागू आहेत. त्यांच्याप्रमाणेच मी जिंकू शकते हा विश्वास मला होता. माझ्या खेळातून सिद्ध केले. मुलींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही कर्मठ विचारांचा आहे. मोटारस्पोर्ट्समध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हाही टीकेचा सूर होता. मात्र घरचे ठामपणे पाठीशी उभे राहिले. देशात मुलींसंदर्भात अनेक घटना घडतात. त्यामुळे अन्य मुलींप्रमाणे घरच्यांनी दिलेले नियम मलाही पाळावे लागतात. पण माझे क्षेत्रच पुरुषबहुल असल्याने घरच्यांना कल्पना आहे. मुळात त्यांचा माझ्यावर विश्वास आहे,’ असे मीराने स्पष्ट केले.

शर्यतीच्या निमित्ताने देशभरात प्रवास होतो. मुलगी शर्यत खेळतेय बघितल्यावर अनेकांना आश्चर्य वाटते. खूप जणांना ही गोष्ट कमीपणाची वाटते. कुतूहलमिश्रित नजरांची सवय झाली आहे. लोकांचा दृष्टिकोन बदलू शकत नाही. क्षमतेला साजेसे सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणे माझ्या हाती आहे. लोकांना काय वाटते याचा विचार करत बसले तर शर्यतीत मागे पडेन. कोल्हापुरात चाहत्यांचा उत्साही पाठिंबा मिळाला असे मीराने आवर्जून सांगितले.

वेगाइतकीच शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. यासाठी मी दररोज व्यायामशाळेत जाते. वेगाइतकंच गाडीचा अभ्यास, ट्रॅकचा अभ्यास, वातावरण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मोटारस्पोर्ट्समुळे भावनिकदृष्टय़ा बळकट झाले. मला कुणी त्रास देऊ शकत नाही; आपले संरक्षण ही आपलीच जबाबदारी आहे याची जाणीव झाली. बडोद्यात आमचा स्वत:चा रेसिंग ट्रॅक असल्याने लहानपणापासून गाडय़ांची सवय होती. बाबांच्या बरोबर ट्रॅकवर जाऊ लागले. नवव्या वर्षी मी पहिल्यांदा गाडी चालवली. सुरक्षा आणि नियम दोन्ही गोष्टींचे पालन करून वेगात गाडी चालवू शकते हा विश्वास घरच्यांना जाणवला आणि कार्टिग विश्वात माझा प्रवेश झाला.