मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा महिला विश्वचषकात निसटता पराभव झाला. लॉर्डसवर रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत झालेल्या पराभवानंतर मितालीने पुढील विश्वचषकात मैदानात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. विश्वचषकात खेळणार नसल्याचे तिने स्पष्ट केले असले तरी अद्याप निवृत्तीसंदर्भात कोणताही विचार नसल्याचे संकेतही तिने दिले. सध्या ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. एवढेच नव्हे तर यंदाच्या विश्वचषकात सातत्यपूर्ण खेळी करत तिने ९ सामन्यात एकूण ४०८ धावा केल्या. अंतिम सामन्यात ती १७ धावावर असताना वाईट प्रकारे धावबाद झाली. तरी देखील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडची टॅमी बाऊमेंटने सर्वाधित ४१० धावा केल्या आहेत.  या स्पर्धेतील मितालीची कामगिरी पाहाता ती आणखी काही वर्षे भारतीय क्रिकेटला एका विशिष्ट उंचीवर प्राप्त करुन देण्यास महत्त्वपूर्ण योगदान नक्कीच देईल, ही गोष्ट कोणीही नाकारणार नाही. पण २०२१ मध्ये न्यूझीलंडमध्ये रंगणाऱ्या विश्वचषकात ती खेळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. हा विश्वचषक अखेरचा असेल याचे संकेत तिने यापूर्वीच दिले होते. तिच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा विश्वचषकात भारताला पराभूत व्हावे लागल्याने सुवर्णमय क्षण हातचा निसटल्याची गोष्ट तिच्या मनात नेहमीच सलत राहिल. यापूर्वी मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००५ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. यावेळीच्या संघात आणि लॉर्डमध्ये मैदानात उतरलेल्या संघात बराच फरक होता. मिताली आणि झुलन गोस्वामी या दोघींचा अनुभव आणि नव्या दमाच्या महिलांनी स्पर्धेत दमदार कामगिरी करत जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

विश्वचषक स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना आणि स्पर्धेतील अखेरचा सामना असा योगायोग क्रिकेट चाहत्यांना रविवारी अनुभवायला मिळाला. एवढेच नाही, तर इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताच्या सलामीवीर पुनम राऊतने ८६ धावांची खेळी केली होती. तेवढ्याचं धावा तिने अंतिम सामन्यातही केल्या. सलामीच्या आणि अंतिम सामन्यात फरक एवढाच होता की, पहिला सामना भारताने जिंकला. तर अंतिम सामन्यात इंग्लंडने स्पर्धेतील पराभवाची परतफेड करत विश्वचषकावर नाव कोरले. अंतिम सामन्यात अखेरपर्यंत भारतीय संघाची सामन्यावर पकड दिसत होती. त्यामुळे यंदा लॉर्डसच्या मैदानावर मितालीच्या नेतृत्वाखालील संघ ऐतिहासिक कामगिरी करणार असे वाटत होते. मात्र अखेरच्या क्षणी इंग्लंडच्या अन्या श्रुबसोलोच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजी कोलमडली. भारताला या सामन्यात ९ धावांनी पराभूत व्हावे लागले.