मोहालीच्या मैदानात भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने न्यूझिलंड विरुद्ध धमाकेदारी खेळी करताना नवा विक्रम आपल्या नावे केला. धोनीने षटकाराने सामना संपविण्याची क्षमता असणारा खेळाडू म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे करुन त्याने आपल्याकडे अजूनही उत्तुंग फटकेबाजी करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. महेंद्र सिंह धोनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला. भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावे होता.  सचिन तेंडुलकरने सर्वाधिक १९५ षटकार ठोकले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात धोनीने सचिनचा विक्रम मोडीत काढला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ३५१ षटकार ठोकले आहेत. तर श्रीलंकेचा सनथ जयसुर्या २७० षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाद ख्रिस गेल ३३८ षटकार ठोकून तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा मॅक्युलम २०० षटकारासह चौथ्या स्थानावर आहे. धोनीने आजच्या सामन्यात सचिनचा विक्रम मोडीत काढत दिग्गज षटकार किंगच्या यादीमध्ये पाचवे स्थान मिळविले आहे.

दरम्यान, षटकाराचा विक्रम प्रस्थापित करण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. धोनी सर्वाधिक धावा बनवणारा तिसरा यष्टीरक्षक आहे. भारताचे दोन गडी बाद झाल्यानंतर धोनी मैदानात उतरला असून विराट कोहलीसोबत धोनीने  दमदार भागीदारी करुन भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. धोनीने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ९१ चेंडूत ८० धावांची दमदार खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.