बाद फेरीच्या आशा संपुष्टात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला नमवत बाद फेरीसाठी दावेदारी सिद्ध करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे.

विराट कोहली, ख्रिस गेल, शेन वॉटसन, एबी डी’व्हिलियर्स अशा एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असूनही बेंगळुरूला मानहानीकारक पराभवांना सामोरे जावे लागले आहे. सातत्याने विनाकारण संघात बदल करण्याचे प्रयोगही बेंगळुरूला महागात पडले आहे. बाद फेरीचा मार्ग बंद झाला असला तरी लौकिकाला साजेसा खेळ करण्यासाठी विराट कोहली आतूर आहे. एबी डी’व्हिलियर्सला मुंबईचे वानखेडे मैदान आवडते. छोटय़ा आकाराच्या या मैदानावर मोठी खेळी करण्यासाठी एबी उत्सुक आहे. ख्रिस गेल मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकते. भारतीय संघातले स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्नशील केदार जाधव मोठी खेळी करण्यासाठी सज्ज आहे.

बेंगळुरूचा गोलंदाजी ताफा उत्तम असूनही संघाच्या विजयात त्यांना योगदान देता आलेले नाही. सॅम्युअल बद्री, युझवेंद्र चहल आणि पवन नेगी या फिरकीपटूंनी धावा रोखणे आणि विकेट्स पटकावणे या दोन्ही आघाडय़ांवर स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र टायमल मिल्स, अ‍ॅडम मिलने या विदेशी गोलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. श्रीनाथ अरविंद, अनिकेत चौधरी यांना कामगिरीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

मुंबईने नऊपैकी सात सामन्यात विजय मिळवला आहे. घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी आणखी आश्वासक आहे. पार्थिव पटेलला अर्धशतकी खेळी साकारता आलेली नाही मात्र उपयुक्त ३० किंवा ४० धावांची खेळी करत त्याने संघाच्या विजयात योगदान दिले आहे. जोस बटलर, नितीश राणा, रोहित शर्मा यांना सूर गवसणे मुंबईसाठी जमेची बाजू आहे. हार्दिक आणि कृणाल पंडय़ा ही अष्टपैलू खेळाडूंची जोडी मुंबईसाठी महत्वपूर्ण आहे. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत या जोडीने मुंबईने तारले आहे. लसिथ मलिंगा तंदुरुस्त होऊन परतला आहे. मिचेल मॅक्लेघान सातत्याने विकेट्स मिळवतो आहे. सुपर ओव्हरमध्ये केवळ सहा धावा देत संघाला विजय मिळवून देणारा जसप्रीत बुमराह मुंबईसाठी निर्णायक आहे. अनुभवी हरभजन सिंगने पॉवरप्लेच्या षटकांदरम्यान गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीला वेसण घातली आहे.