मुंबईच्या वाटय़ाला अगदी क्वचितच फिरकणाऱ्या गुलाबी थंडीच्या साक्षीने रविवारी बहुतांश मुंबईकर धावले. मात्र ही धाव कोणतीही लोकल गाडी पकडण्यासाठी किंवा ऑफिसातली वेळ गाठण्यासाठी नसून केवळ आनंदासाठी होती. रविवारी पहाटेपासूनच सुरू झालेली १०वी स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन गेल्या नऊ वर्षांप्रमाणेच यंदाही मोठय़ा उत्साहात आणि खास ‘मुंबईकर’ स्टाइलने पार पडली.

मिलिंद आणि राहुलची जोडी झक्कास!
मुंबई स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉनच्या पहिल्या वर्षांपासूनच यात भाग घेणाऱ्या मिलिंद सोमण आणि राहुल बोस या दोघांनी यंदा ‘अर्ध मॅरेथॉन’मध्ये भाग घेतला होता. विशेष म्हणजे २१ किलोमीटरची ही मॅरेथॉन या दोघांनीही साधारणपणे एकाच वेळी संपवली.  इतर दिवशी फक्त कामासाठी धावणारे मुंबईकर फक्त आनंदसाठी धावताना पाहणे आपल्याला नेहमीच आवडते. ही मॅरेथॉन म्हणजे स्पर्धा नसून खिलाडूवृत्ती जागवणारा एक समारंभ आहे, असे मिलिंद सोमण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर, मुंबई मॅरेथॉनचे वर्णन एका शब्दात करायचे झाल्यास ‘प्रेरणादायी’ हाच शब्द आपल्याला सुचतो. सगळी बंधने झुगारून लोक एकत्र येऊन येथे एका चांगल्या कारणासाठी धावतात. ही गोष्टच मला दरवर्षी धावण्यासाठी प्रेरणा देते, असे राहुल बोसने सांगितले.

नाशिक ढोल, भांगडा आणि ड्रीम रन!
मुंबई मॅरेथॉनमधील सर्वात उत्साहवर्धक स्पर्धा म्हणजे ‘ड्रीम रन’! यंदा या ड्रीम रनसाठी तब्बल २० हजार मुंबईकरांनी नावे नोंदवली होती. या ड्रीम रनमधील सहभागी स्पर्धक विविध कारणांसाठी धावले. त्यात स्त्री-भ्रूणहत्या, महिलांची सुरक्षा, पर्यावरण संवर्धन अशा अनेक सामाजिक विषयांचा समावेश होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही या ‘रन’मध्ये अनेक कंपन्या व बँका यांनी आपापल्या जाहिराती करून घेतल्या. मात्र ड्रीम रनचे आकर्षण ठरले ते म्हणजे काही ग्रुप्सनी नाशिक ढोलाच्या तालावर सादर केलेली नृत्ये आणि भांगडा! नाशिक ढोलच्या तालावर नाचत जाणाऱ्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी छोटेखानी मानवी मनोरा उभा करत मुंबईकरांच्या लाडक्या ‘दहीहंडी’ची आठवण करून दिली.
तारें मॅरेथॉन पर!
प्रत्येक वर्षी मुंबई मॅरेथॉनचे आकर्षण असणारे बॉलिवूडमधील कलाकार यंदाही मोठय़ा संख्येने मुंबईकरांना धावण्यासाठी प्रवृत्त करायला मॅरेथॉनच्या मंचावर आले होते. यात शर्मन जोशी, विवेक ओबेरॉय, साक्षी तन्वर, तारा शर्मा, दिलीप ताहीर, अश्मित पटेल, जॉन अब्राहम, विद्या माळवदे, गुलशन ग्रोव्हर, कल्की कोहेचिन, दिया मिर्झा, पूरब कोहली अशा अनेकांचा समावेश होता. त्याचप्रमाणे उद्योगपती अनिल अंबानी यांनीही अर्ध मॅरेथॉनमध्ये धावत आपला सहभाग दर्शवला.
घे भरारी!
मुंबई मॅरेथॉनच्या प्रत्येक वर्षी प्रतिकूल शारीरिक परिस्थितीवर मात करत ही स्पर्धा खेळणाऱ्या लोकांची उदाहरणे समोर आली आहेत. यंदाही अशी काही उदाहरणे मॅरेथॉनने मुंबईकरांसमोर ठेवत ‘घे भरारी’ असा संदेश दिला. दोन्ही हात तुटल्याने सेनादलातून बाहेर पडलेल्या केरकेटा यांनी दीड तासाच्या वेळेत अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली.