सामना सुरू असताना सीमारेषेजवळ उभे राहून हौशी चाहत्यांना स्वाक्षरी देण्याचा मोह भारतीय खेळाडूंना आता आवरावा लागणार आह़े भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या नियमानुसार खेळाडूंना सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्वाक्षरी देता येणार नाही़  स्वाक्षरीच्या माध्यमातून खेळाडू सट्टेबाजांच्या संपर्कात येण्याची भीती बीसीसीआयला असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आह़े
‘‘सामना सुरू असताना प्रेक्षकांना स्वाक्षरी न देण्याच्या सूचना खेळाडूंना करण्यात आल्या आहेत़  हा नियम आयपीएल, चॅम्पियन्स लीग आणि बीसीसीआयतर्फे आयोजित होणाऱ्या सर्व सामन्यांसाठी लागू असेल़  स्वाक्षरीच्या माध्यमातून सट्टेबाज खेळाडूंच्या संपर्कात येतात़  स्वाक्षरी पुस्तिकेतून सट्टेबाज सामन्यातील महत्त्वाच्या बाबी खेळाडूंपर्यंत पोहोचवू शकतो़  उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या खेळाडूला फलंदाजी करताना अमुक एक धावा करण्यास सांगू शकतो,’’ अशी माहिती बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे वरिष्ठ अधिकारी के. एस. माधवन यांनी दिली़
भारतातील बहुतांश स्टेडियम्सवर सीमारेषेबाहेर मोठय़ा जाळ्या बसविण्यात आल्यामुळे येथे चाहत्यांना स्वाक्षरी मिळवण्यासाठी झगडावे लागते, परंतु परदेशात खेळाडूंची स्वाक्षरी घेणे सहज शक्य आह़े  विश्वचषक स्पध्रेत तसे चित्र अनेकदा पाहायला मिळत आह़े  याबाबत माधवन म्हणाले, ‘‘हे घातक असून आम्ही हा नियम जगभरात लागू करण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’
एनआयए, एसआयटी, सीबीआय, एसीबी आणि लाचलुचपत प्रतिबंध विभाग अशा अनेक तपास विभागांत काम करणाऱ्या माधवन यांनी सट्टेबाजीचा आणखी एक फंडा उघड केला़  ते म्हणाल़े, ‘‘सट्टेबाज आपल्या एका व्यक्तीला सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पाठवितात़़  हा सामना टीव्हीवर काही सेकंदांच्या फरकाने प्रसारित होत असल्याने स्टेडियमवर उपस्थित असलेल्या व्यक्तीकडून धावा जाणून घेतल्या जातात़  त्याआधारे लगेचच सट्टेबाजी केली जात़े  अशा संशयित व्यक्तींवरही आमची नजर असेल़.’’
माधवन आणि त्यांचे सहकारी अंशुमन उपाध्याय हे स्थानिक क्रिकेटवरही लक्ष ठेवून आह़े़  ‘‘यंदाच्या सत्रात दहा ठिकाणांना भेट दिली असून खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथेच आमचा मुक्काम होता़,’’ अशी माहिती त्यांनी दिली़