आनंदाचे डोही, आनंद तरंग!

विश्वनाथन आनंद म्हणजे ६४ घरांचा राजा. बुद्धिबळाच्या खेळातील या राजाने पाचव्यांदा विश्वविजेता होण्याची किमया

तुषार वैती tushar.vaity@expressindia.com | December 27, 2012 3:45 AM

विश्वनाथन आनंद म्हणजे ६४ घरांचा राजा. बुद्धिबळाच्या खेळातील या राजाने पाचव्यांदा विश्वविजेता होण्याची किमया साधली. इस्रायलचा प्रतिस्पर्धी बोरीस गेलफंड याने आनंदला विश्वविजेता होण्यासाठी चांगले झुंजवले तरी आनंदने आपल्या अनुभवाच्या शिदोरीच्या जोरावर ही लढत जिंकून सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपद आपल्याकडेच राखले. या जेतेपदाने आनंदवर सर्वच स्तरांतून कौतुकांचा वर्षांव झाला. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ असेच बुद्धिबळाच्या खेळातील या सम्राटाचे वर्णन करावे लागेल. पण ही लढत सोडल्यास आनंदला अन्य स्पर्धामध्ये विजय मिळवण्यासाठी झगडावे लागले, ही त्याच्या दृष्टीने खेदाची बाब म्हणावी लागेल.
परिस्थिती अनुकूल असो, वा प्रतिकूल विजेतेपदाचा मुकुट आपणच पटकावणार, हे आनंदने आतापर्यंत दाखवून दिले आहे. कोणत्याही स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज असलेल्या आनंदने यापूर्वी अ‍ॅलेक्सी शिरोव्ह, व्लादिमिर क्रॅमनिक, व्हेसेलिन टोपालोव्ह यांसारख्या दिग्गज प्रतिस्पध्र्यावर मात करून विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. पण मॉस्को येथे मे महिन्यात रंगलेली विश्वविजेतेपदासाठीची लढत आनंदसाठी खडतर अशीच होती. या लढतीत बोरीस गेलफंड याने आनंदला कडवी टक्कर दिली. गेलफंडसारख्या प्रतिस्पध्र्याला आपण सहज नमवू, हा अतिआत्मविश्वास आनंदला नडला, असे जाणकांराचे म्हणणे आहे.
गेलफंडने एकापाठोपाठ नवनवीन चाली रचत आनंदला धक्के देण्यास सुरुवात केली. प्रत्येक सामन्यासाठी गेलफंड नव्या चाली रचत असल्यामुळे आनंदला प्रत्येक वेळी वेगळा गृहपाठ करावा लागत होता. गेलफंडच्या कारकिर्दीतील आधीच्या सामन्यांचा अभ्यास करून आनंदचा साहाय्यक चमू (सपोर्ट टीम) त्याच्यासाठी नवनवीन चाली रचत होता. त्यामुळे आनंदचे डावपेच निष्प्रभ ठरू लागले होते. पहिल्या सहा लढती अनिर्णीत राखण्यात आनंदने यश मिळवले. पण सातव्या फेरीत या लढतीला कलाटणी मिळाली. काळ्या मोहऱ्यांसह खेळताना आनंदने गेलफंडवर प्रतिहल्ला चढवण्यासाठी उंटाचा बळी दिला. पण त्याची ही चूक गेलफंडच्या पथ्यावर पडली. आनंदच्या या चुकीचा फायदा उठवून गेलफंडने विजय मिळवून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. गेलफंडच्या चालींना कोणतेही उत्तर देता येत नसल्यामुळे आनंदचा चमू पुन्हा कामाला लागला. आनंदने आठव्या फेरीत आधीच्या सामन्यांप्रमाणेच सुरुवात केली. गेलफंडने ग्रनफेल्ड बचावात्मक पद्धतीने खेळल्या गेलेल्या या लढतीला आधी चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे आनंद हा सामना जिंकेल, याची खात्री कुणालाही नव्हती. पण १४व्या चालीदरम्यान एका गंभीर चुकीमुळे गेलफंडच्या वजिराला वेढा पडला. अखेर आनंदने १७ चालींनंतर विजय मिळवत लढतीत बरोबरी साधली. विश्वविजेतेपदाच्या लढतीत कमी चालींमध्ये संपलेला हा पहिला सामना ठरला.
पुढील चारही गेम बरोबरीत राखण्यात आनंदने समाधान मानले. १२व्या फेरीदरम्यान आनंदला विजयाची संधी होती. पण त्याने विजयासाठी फारसे प्रयत्न न करता सामना जलद डावांमध्ये नेला. जलद पद्धतीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात आनंदचे पारडे जड मानले जात होते. पहिल्या डावात गेलफंडने वेगाने चाली रचून सामना बरोबरीत सोडवला. पण दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना आनंदने झटपट चाली रचल्या. आनंदच्या तुलनेत गेलफंडला चाली रचताना वेळ लागत होता. अखेर गेलफंडकडे चाली चालायला फार कमी वेळ शिल्लक राहिल्याचा फायदा उचलत आनंदने विजय मिळवत आघाडी घेतली. हीच आघाडी आनंदला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात पुरेशी ठरली. कारण पुढील दोन्ही गेम आनंदने बरोबरीत राखले होते.
विश्वविजेतेपद सोडल्यास, आनंदला या मोसमात विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. ‘मी कुठेतरी कमी पडतोय, हे नक्कीच. पण मला माझ्या खेळातील चुका शोधून काढाव्या लागतील. त्यासाठी माझी तयारी सुरू आहे. २०१३च्या मोसमात माझी कामगिरी चांगली होईल,’ असे आनंदने मान्य केले आहे. अलीकडेच झालेल्या लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत आनंदला एक सामना जिंकण्यात यश आले, त्यामुळे त्याची ९ गुणांसह पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवत १८ गुणांसह तिसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. बिलबाओ येथील फायनल चेस मास्टर्स स्पर्धेत आनंदला पहिल्या आठ फेऱ्यांमध्ये एकही विजय मिळवता आला नाही. अखेरच्या नवव्या फेरीत आनंदला मॅग्नस कार्लसनने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे आनंदची सहा जणांच्या या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. खराब कामगिरीमुळे आनंदवर सातत्याने टीका होऊ लागली. पण आपण निवृत्त होणार नाही, असे स्पष्ट करत तर्कवितर्काना पूर्णविराम दिला.
इस्तंबूलमध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने चौथा क्रमांक पटकावत नवा इतिहास रचला. द्रोणावल्ली हरिका, इशा करवडे, तानिया सचदेव, मेरी अ‍ॅन गोम्स आणि सौम्या स्वामीनाथन यांच्या महिला संघाने १७ गुणांसह चौथ्या क्रमांकावर मजल मारली. ऑलिम्पियाडमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याचबरोबर युक्रेनच्या अ‍ॅना उशेनिना हिने बल्गेरियाच्या अ‍ॅन्टोनेटा स्टेफानोव्हा हिचा पराभव करून महिलांच्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेत भारताच्या डी. हरिका हिला उपांत्य फेरीत स्टेफानोव्हा हिच्याकडून हार पत्करावी लागली होती. विश्वविजेतेपदामुळे आनंदसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले असले तरी पुढील वर्षी रंगणाऱ्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत जेतेपद कायम राखण्यासाठी आनंदला जय्यत तयारी करावी लागणार आहे, हे निश्चित!

First Published on December 27, 2012 3:45 am

Web Title: pleasure abyss pleasure wave