खेळपट्टीवर थोडेसे गवत असेल तर त्यावर फलंदाजांची किती त्रेधातिरपीट उडते याचा प्रत्यय येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाहावयास मिळाला. कर्नाटकने पहिल्या डावात केलेल्या २०२ धावांना उत्तर देताना विनय कुमारच्या प्रभावी माऱ्यापुढे मुंबईचा पहिला डाव ४४ धावांत कोसळला. मात्र कर्नाटकची दुसऱ्या डावात २ बाद १० अशी स्थिती झाल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली.
उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शार्दूल ठाकूर (४/६१) याच्या माऱ्यापुढे कर्नाटकचा पहिला डाव २०२ धावांमध्ये आटोपला. रॉबिन उथप्पा (६८) व करुण नायर (नाबाद ४९) यांनी केलेल्या शैलीदार खेळामुळेच कर्नाटकला दोनशे धावांपलीकडे पोहोचता आले. कर्नाटकच्या माफक आव्हानास तोंड देताना मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली. आर. विनयकुमार या अनुभवी गोलंदाजाने सहा बळी घेत मुंबईच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. पहिल्या डावात कर्नाटकला १५८ धावांची आघाडी मिळाली.
कर्नाटकचा कर्णधार विनय कुमार याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. लोकेश राहुल (१५) व  रवीकुमार समर्थ (३) हे दोघे अवघ्या ३४ धावांत बाद झाले. तथापि उथप्पा व मनीष पांडे यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. उथप्पा याला विल्किन मोटा याने बाद करीत ही जोडी फोडली व तेथेच कर्नाटकच्या घसरगुंडीला प्रारंभ झाला. उथप्पा याने १४६ मिनिटांत १० चौकार व एक षटकारासह ६८ धावा केल्या. पांडे याने दमदार खेळ करीत ३४ धावा केल्या. ही जोडी फुटल्यानंतर कर्नाटककडून मोठी भागीदारी झाली नाही. करुण नायरने चिवट खेळ करीत नाबाद ४९ धावा केल्या. 
या उत्तरात उतरलेल्या मुंबईला अखिल हेरवाडकर याला शून्यावर बाद करीत विनय कुमारने झटका दिला. त्याला अभिमन्यू मिथुन व श्रीनाथ अरविंद यांनीही योग्य साथ दिली. या त्रिकुटापुढे मुंबईचा डाव केवळ १५.३ षटकांत ४४ धावांवर कोसळला.

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक : (पहिला डाव) २०६ (रॉबिन उथप्पा ६८, मनीष पांडे ३४, करुण नायर नाबाद ४९, शार्दूल ठाकूर ४/६१, विल्किन मोटा २/१८) व (दुसरा डाव) २ बाद १०. मुंबई : (पहिला डाव ) ४४ (आर. विनयकुमार ६/१८, श्रीनाथ अरविंद २/१).

१९७७-७८
सालच्या रणजी सत्रात  गुजरातने मुंबईला ४२ धावांत गुंडाळले होते. केवळ दोन धावांनी कर्नाटकला हा विक्रम  नावावर करण्यात अपयश आले.