cricket-blog-ravi-patki-670x200
कोणत्याही फलंदाजा करिता सर्वात सोपा चेंडू कोणता तर त्याचं उत्तर लेग स्टंपवर पडलेला असं देता येईल. लेग स्टंपच्या दिशेने येणारा चेंडू हवेतून येताना ओळखणे सहज शक्य असते. पॅडवर पडलेला चेंडू लेग साईडला मारणे सहज शक्य असते. पायचितची शक्यता खूप कमी असते कारण चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणार असा कयास असतो. तसेच चेंडू लेग स्टंपवर पडून ऑफकडे जाणे अशक्य नसले तरी  असा स्वप्नवत चेंडू सारखा पडत नाही. त्यामुळे लेग स्टंप हा फलंदाजाकरता सांताक्लॉज असतो. तो भरपूर धावा देतो आणि बादही करत नाही.
या उलट ऑफ़स्टंपची दहशत क्रिकेटमध्ये सर्वाधिक. फलंदाज निवृत्त होईपर्यंत ऑफ स्टंपला वश करू शकत नाही. ऑफ स्टंप वरचा गुड लेंथ चेंडू फलंदाजाचे ह्रदयाचे ठोके चुकवतो. ऑफ स्टंपवर गुड लेंथ आणि उत्तम लाइन वर पडलेला आणि थोड़ा स्विंग होणारा चेंडू पुढे खेळा, मागे खेळा, ड्राइव्ह करायला जा यष्टीमागे झेल जायची शक्यता असते. उत्तम लाइनवर पडलेला चेंडू  बाहेर जाईल म्हणून सोडला  तर अचानक आत येऊन ऑफ स्टंप उद्ध्वस्त होऊ शकतो. थोडक्यात ऑफ स्टंपवर पडणारा चेंडू घरून कॉलेजला निघालेल्या मुलासारखा असतो. तो कुठे जाईल याचा नेम नाही.
अशा बेभरवशी आणि घातकी ऑफ स्टंप लाईनला क्रिकेटमध्ये कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी म्हणतात हे आपण जाणतोच. विराट कोहलीला इंग्लंडमध्ये या ऑफ स्टंपने चांगलाच इंगा दाखवला. त्या नंतर विराटने पेटून उठून या ऑफ स्टंपला वश करण्याची मिशन आखली. गेल्या तिन वर्षात अफ्रिका, ऑस्ट्रेलियासारख्या आवाहनात्मक खेळपट्टयांवर त्याने ऑफ स्टंपवर कधी कमालीच्या कौशल्याने चेंडू सोडून तर कधी आक्रमक खेळ करून असामान्य फलंदाजीचे दर्शन घडवले. सध्या चालू असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याने द्विशतक केले. ते करताना त्याची ऑफ स्टंपवरची रणनिती लाजवाब होती. चेंडू स्विंग होत होता. पण आधीच क्रीजच्या बाहेर उभा राहणारा कोहली ऑफ स्टंपच्या आसपास पडणाऱ्या चेंडूला खूप मोठी ढांग पुढे टाकून कव्हरच्या मधून हलक्या हाताने सीमारेषेवर पाठवत होता. स्लिपमध्ये किती क्षेत्ररक्षक आहेत, याचा नीट अंदाज बांधत ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणारे चेंडू देखील त्याने उत्तम कौशल्याने पाचव्या स्लिपच्या दिशेने मारून चौकार वसूल केले. लोकांना वाटत होते तो धोका पत्करतोय पण त्याने केलेल्या ऑफ स्टंपच्या अभ्यासाचे हे फलित आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने रणनिती बदलून चेंडू सोडण्यात देखील तो किती उस्ताद आहे हे दाखवून दिले.
लोकांना असाध्य असणाऱ्या गोष्टींना साध्य करणारे जेते होतात आणि असाध्य गोष्टींना साध्य करुन त्यावर वर्चस्व गाजवणारे जीनियस असतात.
कोहलीतील जीनियस असाध्य ऑफस्टंपला कवेत घेऊन ऑफ़स्टंपचा सहजसाध्य लेग स्टंप करण्याच्या मार्गावर आहे. आता इंग्लंडमध्ये या परीक्षेच्या एव्हरेस्टवर तो नक्की झेंडा रोवेल, याची खात्री वाटतीये. क्रिकेटमध्ये भाकित करणे वेडेपणाचे असते हे खरे असले तरी ज्या गोष्टी ढळढळीत दिसतात त्यांना नाकारणे हे सुद्धा शहाणपणाचे नाही.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 DC vs LSG Match Updates in marathi
LSG vs DC : डीआरएसवरून गोंधळ! ऋषभ पंतने अंपायरशी घातला वाद, रिप्लेमध्ये झाला खुलासा
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
British Prime Minister Rishi Sunak batting in the net session with England players
Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा केला सामना, VIDEO होतोय व्हायरल