पदार्पणातच गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हादरवणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा सूरच हरवला आहे काय, असा प्रश्न पडत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाची आयपीएल स्पर्धेत पुन्हा विजयपथावर येण्यासाठी रविवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध कसोटी लागणार आहे.

पुण्याच्या संघाला शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवातून सावरण्यापूर्वीच त्यांना कोलकाता संघाशी दोन हात करावे लागणार आहेत. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपकी तीन सामने त्यांनी गमावले आहेत.

फॅफ डू प्लेसिस, स्टीव्हन स्मिथ, अजिंक्य रहाणे, थिसारा परेरा, रजत भाटिया व स्वत: कर्णधार धोनी यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. धडाकेबाज केव्हिन पीटरसन या लढतीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी अ‍ॅल्बी मॉर्केल किंवा मिचेल मार्शला संधी मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजीतही पुण्याला खूप उंची गाठण्याची आवश्यकता आहे. पहिल्या पाच षटकांमध्ये व शेवटच्या पाच षटकांमध्ये त्यांचे गोलंदाज टप्पा व दिशा यावर अपेक्षेइतके नियंत्रण ठेवू शकत नाहीत असेच पाहावयास मिळाले आहे. कोलकाता संघाच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण यश मिळविले आहे.

सामन्याची वेळ : रात्री ८ पासून