सर्वकालीन भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या मांदियाळीत स्थान मिळवणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी प्रशिक्षक असताना निराशा केली होती, अशी टिपण्णी करीत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आत्मचरित्राला अनुकूल वातावरण निर्माण केले. मात्र याबाबत प्रतिक्रिया देणे कपिलदेव यांनी टाळले. महान फलंदाज सचिनचे हे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘प्रत्येकाला वैयक्तिक मत देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे मी त्या मताचा आदर करतो. सचिनला भावी आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा,’’ असे कपिल यांनी सचिनच्या टीकेला उत्तर देताना सांगितले. १९९९-२०००च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघासाठी रणनीती आखताना प्रशिक्षक या नात्याने कपिल यांचा सहभाग नसायचा. त्यांच्या कामगिरीवर मी निराश होतो, असे सचिनने ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपदाची कितपत संधी आहे, याविषयी अंदाज बांधण्यासही कपिल यांनी नकार दिला. ‘‘मी कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचणार नाही. पण माझ्या शुभेच्छा भारतीय खेळाडूंच्या पाठीशी कायम आहेत. भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे. चांगले खेळल्यास, भारत विश्वचषक जिंकेल, हे सांगण्याची गरजच भासणार नाही,’’ असे कपिल देव म्हणाले.