भारतीय क्रिकेट संघाचे नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पदभार स्विकारल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक न झाल्याने रवी शास्त्री यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. रवी शास्त्रींच्या वादाबाबत अनिल कुंबळे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘मी रवी शास्त्री यांना सर्वप्रथम फोन केला होता. संघाचा प्रशिक्षक म्हणजे केवळ रवी शास्त्री किंवा अनिल कुंबळे असे होत नाही. हा एका व्यक्तीपुरता मर्यादीत विषय नाही. व्यक्तीपेक्षा संघ महत्त्वाचा आणि संघाने चांगले खेळावे ही सर्वांची इच्छा असते’

वाचा: गांगुलीने त्याच्या कामाचा मान ठेवावा – शास्त्री

दरम्यान, २१ जुलैपासून सुरू होणाऱया वेस्ट इंडिज दौऱयाआधी भारतीय संघाने बंगळुरूत सराव शिबीराला उपस्थिती लावली. अनिल कुंबळे देखील संघासोबत नेटमध्ये उपस्थित होते. सराव शिबीरात आम्ही जास्तीत जास्त आऊटडोअर सेशनवर भेर देत असून, सकाळी ९ वाजता पहिले सराव शिबीर, तर दुपारी दोन वाजता दुसरे सराव शिबीर सुरू होते, असे कुंबळे म्हणाले.

वाचा: ..अन् बीसीसीआयनेच रवी शास्त्रींचा फलंदाजी प्रशिक्षक होण्याचा मार्ग रोखला!

भारतीय संघाचा सध्याचा उत्तम समतोल आहे. विराट कोहली, मुरली विजय, अमित मिश्रा आणि इशांत शर्मा यांच्या गाठीशी कसोटी क्रिकेटचा बऱयापैकी अनुभव आहे. माझ्या कारकीर्दीच्या काळातील काही अनुभवांचाही उपयोग सराव शिबीरात होईल, असेही कुंबळे पुढे म्हणाले. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोघांशीही माझे बोलणे झाले असून, संघाचा पुढील मार्ग काय असेल? यावर आमची चर्चा झाल्याचे कुंबळे यांनी सांगितले.