ज्या ठिकाणी आचरेकरांच्या शिकवणीने सचिनला क्रिकेटच्या देवाची उपमा मिळाली. त्याच क्रिकेटच्या मैदानातून आज गुरुसमोर शिष्याच्या दबंगगिरीचे किस्से ऐकायला मिळत आहेत. भारतीय क्रिकेट आणि प्रशिक्षकांच्यातील वादाची ही पहिली घटना नाही. यापूर्वी ग्रेग चॅपल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील वादंग क्रिकेट चाहत्यांनी अनुभवले आहे. यावेळी मैदानात दादागिरी करणाऱ्या ग्रेग चॅपल यांच्यापेक्षा क्रिकेट चाहत्यांनी दादा अर्थात सौरव गांगुलीला समर्थन दिले. मात्र सध्याच्या घडीला विराट virat kohli कदाचित समर्थनाला पात्र ठरणार नाही. मैदानावर सातत्याने चांगली खेळी करत कोहलीची क्रिकेटविश्वात विराट दिशेने वाटचाल सुरु आहे. मात्र नेतृत्वाची धुरा सांभाळताना त्याच्यात निर्माण झालेला अहंकार हा चांगल्या नेतृत्त्वाचे लक्षण मुळीच नाही. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान इंग्लंडमध्ये विराटने थेट कुंबळेंना संघातील एकाही खेळाडूला तुमच्या मार्गदर्शनाखाली खेळायचे नाही, असे सांगितले. त्याच्या या उद्धटपणानंतर सयंमी कुंबळेंनी राजीनामा देवून संघाला अलविदा केले.

विशेष म्हणजे कुंबळे anil kumble  शिवाय कॅरेबियन दौऱ्यावर चाललो आहोत याची संघातील एकाही खेळाडूला कल्पना नव्हती. विराटने सैराट खेळीने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली हे सत्य असले तरी कुंबळेंनी १८ वर्षांच्या कारकिर्दीत संयम आणि शिस्त काय असते, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे या वादात कुंबळेंकडे कोणताही क्रिकेट जाणकार बोट नक्कीच करणार नाही. मग विराट चुकतोय का? हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. थोडा विराटच्या बाजून विचार केल्यास २०१९ चे मिशन फत्ते करण्यासाठी संघातील सहकाऱ्यांच्या भावना त्याला कुंबळेंपर्यंत पोहोचवायच्या होत्या. त्यामुळेच मिनी विश्वचषकातच त्याने हा पवित्रा घेणे पसंत केले असावे, असे मानायलाही हरकत नाही. मग तर भारतीय संघातील खेळाडूंबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. गावस्करांचा स्ट्रोक परफेक्ट ठरेल. कोणतेही काम आवडीने किंवा सवडीवर नव्हे तर जबाबदारीने पार पाडावे लागते. पण सध्याचा संघातील खेळाडू याबाबतीत बेफिक्रे आहेत असेच म्हणावे लागेल. हा अर्थ सर्वांना लागू होत नसला तरी एकामुळे टीमचा गोंधळ उडतो हे देखील नाकारता येणार नाही.

यापूर्वी सौरव गांगुली आणि चॅपेल यांच्यातील वादानंतर बीसीसीआयने राहुल द्रविडच्या खांद्यावर नेतृत्व सोपवले. बिकट परिस्थितीत त्याने खिलाडूवृत्तीने ही जबाबदारी स्वीकारली. कदाचित याच प्रकरणाचा परिणाम २००७ च्या विश्वचषकात दिसून आला. द्रविडच्या नेतृत्वात सचिन सेहवाग या सारख्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असताना भारताला बांगलादेशविरुद्ध मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेटवर काळे ढगच दाटून आले. भारतीय क्रिकेटमध्ये अंधःकार पसरला. या पराभवानंतर द्रविडने काही न बोलता कर्णधारपद सोडले. त्याच काळात भारतीय संघाच्या यष्टीरक्षकाची जबाबदारी देखील द्रविडने पार पाडली. तो कर्णधार म्हणून किती यशस्वी झाला यापेक्षा त्याने थोड्या कालावधीत शिस्तबद्ध खेळाडूसोबत गुणी कर्णधाराच्या पक्तींत नाव कमावले.

त्यानंतर बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली. नवख्या खेळाडूंना घेऊन गाडी पटरीवर आणायचं त्याच्यासमोर आव्हान होत. त्याने गाडी रुळावरच नव्हे तर एक्स्प्रेस गतीने पळवण्याचे संकेत दिले. कर्णधाराची धुरा हाती घेतल्यानंतर २००७चा पहिला विश्वचषकावर त्याने नाव कोरले. धोनी हा भारतीय संघाला यशाच्या शिखरावर घेऊन गेला. त्याने ही आवडीच्या खेळाडूला संघात घेण्यास प्राधान्य नक्कीच दिले. पण यापेक्षाही त्याने शांत डोक्याने मैदानात घेतलेल्या अनेक निर्णयांनी क्रिकेटमध्ये धक्कादायक निकालाची अविस्मरणीय नोंद केली. त्याचा नेतृत्त्व सोडण्याचा निर्णय हा स्वत:चा होता की त्याच्यावर दबाव आणला गेला हे सत्य फक्त त्याला आणि बीसीसीआयलाच ठाऊक असेल. पण या मोठ्या निर्णयानंतर ही तो मैदानात शांत डोक्यानेच उतरताना दिसतोय. अर्थात विराटने गांगुली, द्रविड आणि धोनीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला असता तरी आजचे रामायण घडले नसते.

भविष्याचा विचार करुन धोनीची सूत्रे कोहलीच्या हाती आली आहेत. यात आता त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघांची कामगिरी चांगली असली तरी कर्णधार म्हणून त्याने अजून छाप पाडलेली नाही. यासाठी त्याला काही वेळ द्यायला हवा. पण सध्या त्याच्यावर पडलेला ठपका नेतृत्त्व गुण सिद्ध करण्यासाठी त्याला मोठा अडथळा ठरु शकतो. दुसरा मद्दा असा की, कोणाचा आदर करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण कोणाचा अनादर होणार नाही याची काळजी तर घ्यायला हवीच. त्यात तुमचा चाहता वर्ग तुम्हाला फॉलो करत असेल तर तुमची जबाबदारी आणखी वाढते. त्यामुळे मैदानात धावांचा पाऊस पाडून कहर करणाऱ्या विराटने हे भान राखणे आवश्यक होते. आता विराटला कुंबळेंचा आदर आहे हे ठिक आहे, पण अनादर दाखवून आदर व्यक्त करण्याची त्याची खोड न रुचणारी अशीच आहे. त्यामुळे एकूणच विराटचे असे वागणे बरं नव्हे, असेच म्हणावे लागेल. पुढील काळात भारतीय संघाच्या कामगिरीवर त्याच्या नेतृत्त्वाचा लेखाजोखा होईलच, पण कुंबळे आणि कोहली यांच्यात रंगलेला खेळ विराटच्या कारकिर्दीला लागलेल ग्रहण म्हणूनच ओळखलं जाईल.

– सुशांत जाधव

sushant.jadhav@indianexpress.com