भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली जितका मैदानात सक्रीय असतो तितकाच तो आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील मनसोक्त वावरताना दिसतो. विराटचा मजेशीर स्वभाव आपण आजवर अनेकदा पाहिला आहे. विराटने एका कार्यक्रमात देखील आपल्या सहकारी खेळाडूंची नक्कल करून एकच हास्यकल्लोळ केला होता. नुकतेच दिल्ली येथील तिसऱया एकदिवसीय सामन्याआधीच्या सरावावेळी विराट कोहलीने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीची नक्कल केली. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोघांसाठी यंदाचे वर्ष खूप खास ठरले आहे. यंदाच्या वर्षात दोघांचीही कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. जसप्रीतने केवळ एका वर्षात ट्वेन्टी-२० विश्वात सर्वाधिक विकेट्स मिळविण्याचा विक्रम केला आहे. तर दुसरीकडे कोहली कसोटीपाठोपाठ एखदिवसीय क्रिकेटमध्ये देखील दमदार कामगिरी करताना दिसत आहे.
दिल्ली येथील सामन्यात भारतीय संघाने किवींवर दणदणीत विजय साजरा करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद १५४ धावांची खेळी साकारून आपल्यातील मॅचविनरचे कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.

VIDEO: विराटने केली बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल..